पुणे, दि. ३० : पिंपरी चिंचवड येथील २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या वसतिगृहात बाहेरगावाकडील परंतु पुणे, पिंपरी चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, अनाथ असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी व निर्वाह भत्ता दरमहा ९०० रूपये आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पनाचा दाखला, जातीचा दाखला, विद्यार्थ्याच्या व त्याच्या वडिलांच्या आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला, रेशन कार्डची छायांकित प्रत, बोनाफाईड इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी व पालकांनी २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पिंपरी – चिंचवड सेक्टर-४, स्पाईनरोड, संतनगर, पथ क्रमांक -८, ॲक्वार्ड हॉस्पिटल शेजारी, मोशी प्राधिकरण – ४१२१०५ येथे संपर्क साधून प्रवेश अर्ज घेऊन परिपूर्ण भरून द्यावेत, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.