पुणे- चांदणी चौक येथील पुलाचे लोकार्पण सोहळ्याने भाजपमधील विशेषतः कोथरूड मधील राजकीय खेचाखेची आणि भेदभावाचा आखाडा चव्हाट्यावर आणला . या सोहळ्याच्या आधीच पुणे भाजपमधील नेत्यांतील योग्य नेत्यांना डावलण्याचे कारभार वाढल्याने संताप व्यक्त झाले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॅमेज कंट्रोल करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. काल नाराजी व्यक्त करणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आज लोकार्पण कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसलेल्या दिसल्या. इतकेच नाही तर गडकरी यांनी पुण्यातील प्रकल्पांबाबत मेधा कुलकर्णी यांनी वारंवार पाठपुरावा केल्याचा उल्लेख केला.या शिवाय त्यांनी अनिल शिरोळे , गिरीश बापट या दोन्ही खासदारांनी चांदणी चौकाच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार निवेदने दिल्याचाही उल्लेख केला .


पुण्यातील चांदणी चौक येथील पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमापूर्वी भाजपमधील निष्ठावंतांचा संताप उफाळून आल्याचे पाहायला मिळाले होते. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी थेट आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. त्यात मध्यस्थी करत नितीन गडकरी यांनी नाराजी दूर केल्याची चर्चा आहे. इतकच नाही तर कार्यक्रमानंतर गडकरी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली . यावेळी त्यांनी आता यापुढे कोणालाही डावलण्याचा प्रकार खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याचे वृत्त समजते आहे.या शिवाय आपण असे प्रकार होत असल्याचे पक्षातील आणखी वरिष्ठ असलेल्या नेत्यांशी बोलून निष्ठावंत , आणि जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवलाच पाहिजे अशी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे . त्यामुळे कोथरूड चा आखाडा आमचाच म्हणणाऱ्याना चाप बसणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय म्हणाल्या होत्या मेधा कुलकर्णी
कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव नसल्याचा उल्लेख करत मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भात कुलकर्णी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.
चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.
चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?
मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.
साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.
गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.
देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.
माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे.
त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.