पुणे-आपल्या ३२ वर्षाच्या राजकीय आयुष्यात प्रथमच पुण्यातील या पोटनिवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागल्याचे दिसत असून महाविकास आघाडीचे धंगेकर शंभर टक्के विजयी होतील असा ठाम विश्वास राज्यातील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केला. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारवाडा येथून निघालेल्या दुचाकी रॅलीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी अजितदादांबरोबर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
उत्तरोत्तर रंगत चाललेली व दुरंगी लक्षवेधी लढत ठरलेली ही निवडणूक महाविकास आघाडी व भाजपा या दोन्ही पक्षांनी प्रतीश्तेची केली असून आजचा (सोमवार) पुण्यातील दिवस व्हिआयपींच्या वर्दळीमुळे गजबजून निघाला. महाविकास आघाडीतील हे दोन्ही दिग्गज उघड्या जीपमध्ये एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आले होते. उमेदवार धंगेकर व माजी आमदार मोहन जोशी हेदेखील या जीपमध्ये प्रमुख नेत्यांबरोबर सहभागी झाले होते. रॅलीच्या प्रारंभी अजितदादा व बाळासाहेब थोरात यांच्या जीपच्या पाठीमागे खासदार वंदना चव्हाण, माजी मंत्री रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार कमल ढोलेपाटील दुसऱ्या जीप मध्ये सहभागी झाले होते. तर महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते दुचाकीमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. अजितदादांनी आपल्या उजव्या हातामध्ये पंजा हे निवडणूक चिन्ह असलेला फलक बांधून नागरिकांना ते अभिवादन करत होते. फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी शनिवारवाड्यापासून सुरु झालेल्या या रॅलीने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. लालमहाल पासून ही रॅली जेव्हा फडके हौद चौकात आली तेव्हा दीडशे फुटांचा भव्य हार क्रेनच्या सहाय्याने अजितदादा पवार यांच्या गळ्यात घालण्यात आला. याप्रसंगी प्रचंड टाळ्या, शिट्ट्या व ‘एकच वादा अजितदादा’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड असल्याने व पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या परिसरातून ही रॅली जात असल्याने पुणेकर जनता तसेच व्यापारी, दुकानदार, सामान्य नागरिक यांनी रॅली पाहायला प्रचंड गर्दी केली होती. अजितदादांना व बाळासाहेब थोरात यांना ठिकठिकाणी थांबून त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरु होती. फडके हौद चौकातून ही रॅली पुढे अपोलो टॉकीज, हिंदमाता चौक, लोहियानगर पोलीस चौकी, लक्ष्मी रोड, सिटी पोस्ट, एस,पी. कॉलेज, टिळक रोड, गांजवे चौक, अलका टॉकीज चौक, रमणबाग, आप्पा बळवंत चौक येथून सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीची समाप्ती झाली.