पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यासह अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कसबा मतदारसंघातील गुजराती हायस्कूल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्यापारी, गणेश मंडळ आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चार वाजता बैठक होणार होती. मात्र, त्यापूर्वीच शाळा प्रशासनाने मुलांना साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोडल्याची घटना घडली आहे.आमच्या प्रत्येक वर्गात येऊन शिक्षकानी सांगितले की, आज आपल्या शाळेत एकनाथ शिंदे यांची बैठक होणार आहे. त्यामुळे तुम्हाला साडेतीन वाजता सोडण्यात येणार आहे. आणि त्यानंतर काहीच वेळात सोडण्यात आले. आमची शाळा रोज १२ वाजता भरते आणि पाच वाजता सुटते. पण, आज अचानक शाळा सोडल्याने आम्ही रिक्षावाले काकांची वाट पाहत आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमुळे एक तास लवकर शाळा सोडल्याने काही मुलांना आनंद झाला. लवकर घरी जायला मिळाले, पण काही मुलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणावर शाळा प्रशासनाने उत्तर देणे टाळले.