पुणे- पुण्यातील शिवनेरीवरील शिवजन्मोत्सव सोहळा आणि पुण्यातील शिवसृष्टीचा सोहळा या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहणाय्साठी दिल्या जाणाऱ्या पासेस बाबत शासकीय अधिकारी आणि काही व्यक्ती ,संस्था यांनी दुजाभाव आणि गटबाजी केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान यातील शिवनेरी वरील बाब लक्षात येताच संभाजीराजे छत्रपती यांनी संबधितांना खडेबोल सुनावले आहेत .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीदिनी शिवनेरीवर आयोजित शासकीय कार्यक्रमात जाण्यासाठी VIP पासेस बंधनकारक का करण्यात आले? असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.तसेच, शिवप्रेमींसोबत दुजाभाव करू नका. सर्वांना शिवरायांच्या दर्शनाचा अधिकार आहे, असे खडेबोलही त्यांनी राज्य सरकारला सुनावले.
आज शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा सुरू असताना शिवप्रेमींना बाहेरच अडवले गेले. त्याचवेळी संभाजीराजे छत्रपती शिवनेरीवर येत असताना शिवप्रेमींनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर जोपर्यंत या शिवप्रेमींना आत जाऊ दिले जात नाही, तोपर्यंत आपणही शिवनेरीवर जाणार नाही, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. त्यामुळे काही काळ शिवनेरीच्या पायथ्याशी गदारोळ झाला.
ज्यांना वशिला, त्यांनाच पास
शिवनेरीवर पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आज शिवरायांच्या दर्शनासाठी राज्याच्या ठिकठिकाणाहून नागरिक आले आहेत. रात्री 12 वाजेपासून ते शिवनेरीवर आहेत. अशात VIP पास दाखवून शिवनेरीवर प्रवेश कसा काय दिला जात आहे? ज्यांना वशिला त्यांनाच VIP पास दिला जात आहे. मग सामान्य शिवप्रेमींनी काय करायचे?