पुणे -आज सकाळी कोंढवा बुद्रुक येथील येवलेवाडीतील एका कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोंढवा पोलिस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी गाव येथे येवलेवाडी कमानी जवळ दीपचंद धर्मचंद शहा या फॅब्रिक कंपनीचे गोडाऊन आहे. येथेच आज सकाळी आग लागल्यामुळे गोडाऊन मधील फॅब्रिक मटेरियलने पेट घेतला. त्यामुळे परिसरात आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उठले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
आग लागलेले गोडाऊन व आजुबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षित अंतर आहे. त्यामुळे आगीमुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितलेल आहे. तसेच, शेजारील इमारतीमधील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली आहे.
येवलेवाडी येथे गोडाऊनमधे भीषण आग लागल्याचे समजताच, पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण 12 अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. आग विझवण्याचे काम सुरू असून हे गोडाऊन कापड, पडद्याचे असल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाने दिली. घटनास्थळी 8 फायर इंजिन व 7 वॉटर टँकर आहेत, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी निलेश महाजन यांनी दिलेली आहे.