पुणे, दि. १२ जुलै २०२३: सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आदी योजनांबाबत माहिती देणाऱ्या महावितरणच्या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनचे (मास्मा)च्या वतीने पुणे येथे महालक्ष्मी लॉन्समध्ये दि. ८ व ९ जुलै २०२३ ला सोलर एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये स्वतंत्र स्टॉलद्वारे महावितरणकडून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी-२.०, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स आदी योजनांची माहिती देण्यात आली. केंद्रीय अपांरपरिक ऊर्जा विभागाचे सहसचिव श्री. दिनेश जगदाळे, महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक श्री. पंकज तगलपल्लेवार, ‘मास्मा’चे अध्यक्ष रोहन उपासनी यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी सहसचिव श्री. जगदाळे यांनी महावितरणकडून सौर ऊर्जा योजनांची सुरु असलेल्या प्रभावी अंमलबजावणीचे व जनजागृतीपर उपक्रमांचे कौतुक केले.
या प्रदर्शनामध्ये सौर पॅनेलद्वारे ऊर्जा निर्मिती ते मिटरिंगपर्यंतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व माहितीपत्रके वितरीत करण्यात आले. दोन दिवसांमध्ये सुमारे ३५०० नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली. महावितरणच्या वतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता राकेश महाजन, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी व सहकाऱ्यांनी विविध योजनांची माहिती दिली.