पुणे- खासदार गिरीश बापट आणि कसबा असे समीकरण झालेल्या मतदार संघात पोटनिवडणूक होत असताना आजाराने त्रस्त बापटांना निवडणुकीत सक्रीय होता आले नाही .त्यांच्या निवडणुकीतील असह्भागाने भाजपच्या बालेकिल्ल्याला हादरा बसू शकतो या शक्यतेने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काही मंत्र्यांना व्यापारी, गणेश मंडळे यांच्या भेटीला पाठवले तर काल देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन बापटांना भेटल्यावर आज बापट देखील व्हील चेअर वरून केसरी वाड्यातील कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहिले. त्यांचा चेहरा त्यांचा आजार कथन करत होता , दोन्ही बाजूला गेली ५ वर्षे महापौर आणि स्थायीसामिती अध्यक्षपद भूषविलेले पदाधिकारी होते .अर्थात मागच्या ओळीत बापटांचे खास कार्यकर्ते होतेच . पण आरोग्य संपदा हीच सर्वात मोठी संपत्ती … प्रकृतीचा त्रास सहन करत इथवर पोहोचलेल्या खासदार बापटांनी यावेळी मतदारांना लिहिलेले पत्र यावेळी वाचून दाखविण्यात आले. ते आम्ही इथे जसेच्या तसे देत आहोत …
बापट यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे:
मतदार बंधू भगिनींनो,
सप्रेम नमस्कार.
कसबा विधानसभा मतदारसंघात मुक्ताताई टिळक यांच्या दुर्देवी निधनामुळे पोटनिवडणुक होते आहे. माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर प्रचारात सहभागी होण्यास मर्यादा आहेत, परंतु कसब्यातील मतदार भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी अनेक दशके भक्कमपणे उभा राहिला आहे, याहीवेळेस तो राहणार आणि विजयाची परंपरा कायम राहणार, याबाबत माझ्या मनात विश्वास आहे.पुणे शहर व कसब्याने मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे. सर्व समाजांचा कमावलेला विश्वास ही माझी दौलत आहे. याच कसब्याने माझ्या सार्वजनिक जीवनाला आणि राजकीय कारकिर्दीला आकार दिला. नगरसेवक, आमदार, खासदार, पालकमंत्री या माझ्या प्रवासात कसब्याचे स्थान विशेष राहिले आहे. प्रत्येक घटकाशी संवाद ठेवायचा, कार्यकर्त्याशी मैत्रीजोडायची, या माझ्या नीतीमुळे उदंड प्रेम मला लाभले. खूप कामे मार्गी लावता आली.भाजपाचा हिंदुत्वाचा विचार, विकास आणि राष्ट्रीयत्वाशी नाते सांगणारा आहे. आणि म्हणूनच सारा कसबा सदैव भाजपाला साथ देत आलेला आहे. यामुळेच कसबा म्हणजे भाजपा, कसब्यात कमळच हे समीकरण अभेद्य आहे, अजेय आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा अशा प्रत्येक निवडणुकीत तुमचे पाठबळ भाजपालाच राहिले आहे, याविषयी मी कृतज्ञ आहे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गतीमान विकास सुरू आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला पुन्हा गती आलेली आहे. दाखवण्यासाठी नव्हे तर भविष्य समृद्ध करण्यासाठी कामे करायला हवीत, यावर माझा विश्वास आहे. पुणे महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपाने हे कृतीतून दाखवून दिले आहे. हेमंत रासने हा आमचा कार्यकर्ता या पोटनिवडणुकीतील भाजपा आणि मित्रपक्षांचा उमेदवार आहे.
तीन वेळा नगरसेवक, स्थायी समितीचा तीनदा अध्यक्ष, गणेश मंडळाचा सेवाभावी कार्यकर्ता असलेल्या हेमंतने सोपवलेली जबाबदारी नेहमीच कार्यक्षमतेने पार पाडलेली आहे. या प्रत्येक भूमिकेला न्याय दिलेला आहे. तो कसब्याचा आमदार म्हणूनही आपले कर्तव्य चोख पार पाडेल. या पोटनिवडणुकीत त्याच्या आणि भाजपाच्या पाठीशी ताकदीने उभे राहा. विचार आणि विकासावरील आपली निष्ठा मतपेटीतून पुन्हा व्यक्त करा, ही माझी कळकळीची विनंती आहे.
धन्यवाद,
गिरीश बापट,
खासदार, पुणे
भारतीय जनता पार्टी