पुणे, दि. ६: नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमास जिल्हा प्रशासनाचे सर्व सहकार्य राहील, असे प्रतिपादन निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले.
नेहरु युवा केंद्र पूणे यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, नेहरू युवा केंद्राचे विभागीय संचालक कार्तिकेयन, नेहरू युवा केंद्राचे उपनिदेशक तथा जिल्हा सल्लागार समितीचे सचिव यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या डॉ. संपदा बांगर आदी उपस्थित होते.
श्रीमती कदम म्हणाल्या, नवीन सल्लागार समितीच्या सर्वच सदस्यांनी युवक-युवतींना आपल्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग करून घ्यावे. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून शासकीय, निम शासकीय योजनांची मोहिती ग्रामीण स्तरावर पोहोचवून नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. १४ जून रोजी डेक्कन कॉलेज येथे आयोजित करण्यात येणाऱ्या युवा उत्सवाचा आराखडा तयार करून चांगले नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
श्री. मानखेडकर यांनी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. आमची माती आमचा देश, कॅच द रेन फेस ३, जिल्हास्तरीय युवा उत्सव, पर्यावरण बदल, क्षय रोग निर्मूलन, वृक्ष लागवड, या मोहिमअंतर्गत युवकांचा जास्तीत जास्त सहभाग करून घ्यावा आणि मोहिमा यशस्वी कराव्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
श्रीमती कडू म्हणाल्या, नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमात महिलांचा ५० टक्के सहभाग असावा. त्यासाठी प्रयत्न करावेत. देशात २०२५ पर्यंत क्षयरोगाला पूर्णपणे नष्ट करायचे आहे. त्यादृष्टीने क्षय रोग निर्मूलन चळवळीत युवकांची मदत आवश्यक आहे, असे श्रीमती बांगर यांनी सांगितले.
बैठकीत आमची माती आमचा देश कार्यक्रम, १४ जून रोजी आयोजीत जिल्हास्तरीय युवा उत्सव तयारी, कॅच द रेन फेज ३ अंतर्गत भूजल पातळीत वाढ करण्यासाठी अभियान कार्यक्रम, तालुका प्रतिनिधि, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक निवड इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.