लोकमान्य मेडीकल रिसर्च सेंटरच्या सहकार्याने मदत : लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथे ‘वरदान’ या डायलिसीस सेंटरची सुविधा
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज व लोकमान्य मेडीकल रिसर्च सेंटरच्या विद्यमाने चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे ‘वरदान’ या डायलिसीस सेंटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. या प्रकल्पामध्ये ५ मशीन्स उपलब्ध करून दिल्या असून आणखीन ७ मशीन्स रूग्णांच्या सोयीसाठी वाढवायच्या आहेत. सरकारी योजनेमध्ये अल्प उत्पन्न रूग्णांसाठी उपलब्ध असलेल्या योजनेचा लाभ येथे रुग्णांना मिळणार आहे.
‘वरदान’ या डायलिसीस सेंटरचे उद्घाटन चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे झाले. यावेळी रोटरीचे प्रांतपाल डॉ. अनिल परमार, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या अध्यक्षा नमिता नाईक, सचिव अतुल दुर्वे, सेवा प्रकल्प संचालक विवेक कुलकर्णी, विशेष सेवा संचालक नितीन नाईक, लोकमान्यचे डॉ. व्ही. एस. घोले, संचालक श्रीनिवास पत्तर, सीईओ डॉ. विशाल क्षीरसागर या प्रकल्पासाठी आर्थिक मदत करणारे सिध्दार्थ इंजिनिअरींगचे दिलीप पंडीत, कोव्हेनशिया इंडीया प्रा.लि. चे काशीनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
चिंचवड परिसरात गरजूंना ‘वरदान डायलिसीस सेंटर’ हे आरोग्याच्या दृष्टीने वरदान ठरेल. अधिकाधिक चांगली सुविधा सेवा देण्याचे काम होईल अशी ग्वाही रोटरीचे प्रांतपाल डॉ. अनिल परमार यांनी दिली.
विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मिलींद कुलकर्णी यांनी आभार मानले.