पुणे- विद्यमान नगरसचिव आणि मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर ३१ मे रोजी निवृत्त होत असल्याने आता महापौर कार्यालयातील प्रोटोकॉल अधिकारी म्हणून नवे पद निर्माण करून त्यावर नियुक्त करण्यात आलेला योगिता भोसले-निकम यांची निवड आयुक्त विक्रम कुमार यांनी नगरसचिव पदी केली आहे.
पुणे महापालिकेचे नगरसचिव हे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे. ते अजूनही भरण्यात आलेले नाही. दरम्यान या पदाचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्याकडे दिला जात आहे. सद्यस्थितीत मुख्य कामगार अधिकारी तथा सहायक आयुक्त शिवाजी दौंडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. दौंडकर हे 31 मे ला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे 1 जून पासून या पदाचा अतिरिक्त पदभार राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त यांनी जारी केले आहेत.

महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे पद अत्यंत महत्वाचे आहे. जे महापालिका आयुक्तांच्या तोडीचे हे पद महत्त्वाचे आहे. गेली१० वर्षे या पदावरील अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय घेत पक्षपाती कारभार करत आल्याचा,तर महापौरांच्या हातचं बाहुलं झाल्याचा आरोप वेळोवेळी असलेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केला आहे. लोकशाहीच्या रक्षणाची आणि कोणतीही गोपनीयता न पाळता पारदर्शक कारभाराची जबाबदारी या पदावर बसलेल्या अधिकाऱ्याकडे असते . प्रशासनाच्या आणि महापौरांसह राजकीय लोकांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते. महासभा, महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या नियोजनापासून ते त्यांचे विषयपत्र प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात. महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात. यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिवाची भूमिका महत्त्वाची मानली जाते.अनिरुद्ध नाईक यांच्यानंतर या महापालिकेला चांगला , वादात न सापडलेला नगरसचिव मिळणे दुरापास्त झाल्याचे दिसले . पुणे महापालिकेचे पूर्ण वेळ नगरसचिव असणारे सुनील पारखी हे नगरसचिव कार्यालयातच कारकून पदावर जॉईन झाले होते त्यांच्या अनुभावानुसार त्यांना नगरसचिव पदाची संधी मिळाली , 30 ऑगस्ट 2020 ला निवृत्त झाले. तसेच शेवाळे नामक उप नगरसचिव देखील निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन नगरसचिव नेमण्यासाठी महापालिकेकडून भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार या पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आली होती. परंतु एकही उमेदवार सक्षम आढळला नाही.नगरसचिव कार्यालयात काम केलेल्या व्यक्तीलाच शिक्षण आणि सेवा ज्येष्ठता पाहून हि या पदावर संधी द्यायला हवी असा प्रघात आणि प्रवाह असताना , नगरसचिवांच्या कामकाजाची माहिती कोणालाच नव्हती. या कारणास्तव ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप कोणतीही प्रक्रिया केली गेली नाही. 3 वर्ष होत आली तरी देखील महापालिकेला हे पद भरता आले नाही. महापालिकेने प्रभारी पदभार देऊन काम चालवले. मात्र पुन्हा पद भरती बाबत जाहिरात दिली नाही. महापालिकेचे एवढे महत्वाचे पद असताना देखील याबाबत महापालिका प्रशासनाची उदासीनता लक्षात येत आहे.