मैत्र युवा फाउंडेशन तर्फे ‘एक पणती तिच्यासाठी’ उपक्रमाचा शुभारंभ
पुणे : समाजातील दु:ख समजून घेऊन, त्याबद्दल विचार करुन जो त्या लोकांसाठी काम करतो तो खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता. जोपर्यंत सद्सद् विवेकबुद्धी जागृत ठेऊन समाजासाठी काम करणारे युवक या देशात आहेत, तोपर्यंत देशाच्या भविष्याला धोका नाही, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म. जोशी यांनी व्यक्त केले.
मैत्र युवा फाउंडेशनच्या वतीने ‘एक पणती तिच्यासाठी ‘ या उपक्रमाची सुरुवात एरंडवण्यातील सेवासदन च्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी साहित्यिक वि.दा. पिंगळे, सेवासदन चे चिंतामणी पटवर्धन, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, डॉ. सचिन वानखेडे, सहेली संघाच्या तेजस्वी सेवेकरी, अश्विनी नायर, मैत्रयुवाचे अध्यक्ष संकेत देशपांडे यावेळी उपस्थित होते.
वि.दा. पिंगळे म्हणाले, तरुणांची शक्ती ओळखणे आणि सकारात्मक बाजूने तीला पुढे घेऊन जाणे हे गरजेचे आहे. बल, धन, प्रतिष्ठा या गोष्टी गौण आहेत. आचार विचार आणि संस्कार यांचे धन असणे हे महत्त्वाचे आहे. माणूस कोणती जीवनमूल्ये घेऊन जीवन जगतो यातच त्याचे मोठेपण आहे.
पराग ठाकूर म्हणाले, तरुण वर्गाने बोलण्यासाठी पुढे यायला हवे. युवा बोलेल तेव्हाच देश सुधारेल. कोणतेही काम सुरु करणे सोपे असते, परंतु त्यात सातत्य ठेवणे कठीण असते. मैत्रयुवा मधील तरुणांनी अनेक वर्षांपासून काम सुरु ठेवले आहे, हे कौतुकास्पद आहे.
संकेत देशपांडे म्हणाले, मैत्रयुवा फाउंडेशन मधील तरुणाई ‘ एक पणती तिच्यासाठी ‘ या उपक्रमांतर्गत पणत्या रंगवण्याचे काम दिवाळीच्या सहा महिने आधीपासून सुरू करतात. या पणत्या विकून मिळालेला निधी हा वंचित विशेष मुलांची दिवाळी साजरी करण्यासाठी केला जातो. यामुळे तरुणाईचे या घटकाशी वेगळ्या प्रकारचे आपुलकीचे नाते जोडले जाते.