मुंबई–
गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी केली.
मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची कार्यकारिणी बैठक रविवारी दादर वसंत स्मृती येथे पार पडली.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर, खा. गोपाळ शेट्टी, खा. पुनम महाजन, खा. मनोज कोटक, महामंत्री संजय उपाध्याय, आ. अमित साटम, आ. योगेश सागर, आ. सुनील राणे, आ. पराग अळवणी, आ. कालिदास कोळंबकर आ. मनीषाताई चौधरी, आ. भारती लव्हेकर, आ. विद्या ठाकूर, आ. राजहंस सिंह, आ. कॅप्टन तमिळ सेल्वन, जयप्रकाश ठाकूर, चित्राताई वाघ, माजी खा. किरीट सोमय्या, सुनील कर्जतकर, केशव उपाध्ये, गटनेते प्रभाकर शिंदे, राज पुरोहित, मधू चव्हाण आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वमान्यता
मुंबई शहरातील आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकाचे ऐका मन की बात लोगो की सूनो… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात मुंबई शहरात दहा हजार ठिकाणी ऐकली गेली. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा प्रवास दौरा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. आमचं अन्य पक्षांना आव्हान आहे की, भाजपाच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेला दहा हजार संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले. गरजू महिलांना तसेच २७ हजार कुटुंबांना मदत करण्यात आली.सलग १५ दिवसात ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. विरोधकांच्या पोटात दुखते. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष श्री. बायडन मोदींना म्हणातात, तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिद्ध आहेत. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. टीका करणाऱ्यांचे स्वागत आहे. प्रत्येक टीकेतून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करतो. आम्ही बंद खोलीतून स्वतःच्या मनाशी स्वतः बोलणारे नाही आहोत. आम्ही खुल्या जनतेत बोलणारे नेतृत्व आहोत आणि म्हणून कर्नाटकचे निकाल लागले त्यानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती ते लगेच बोलू लागले. हे खर आहे की, आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला सत्ता मिळाली नाही. हेही विनम्रतेने सांगू आणि त्याचे आत्मचिंतन आणि परीक्षण करणे आमचं कर्तव्य आहे. त्यामध्ये आम्ही मतदाराने दिलेल्या कौलाचा संपूर्ण विनम्रतेने स्वीकार करून त्याचे विश्लेषण करू. निकालाच्या विश्लेषणाचे काम राष्ट्रीय स्तरावर होईल. पोपटपंची करणारे पोपट बोलायला लागल्यावर मी, मुद्दाम आकडेवारीची माहिती घेतली.
त्याठिकाणी एक हजाराच्या खाली जागा गेल्या अशा पाच जागा आहेत. तीन जागा अशा आहेत ज्या दोन हजार मतांनी गेल्या, बावीस जागा अशा आहेत ज्या पाच हजाराच्या आत अंतराने गेल्या आहेत. सहा सात हजाराच्या अंतराने गेल्या अशा सोळा जागा आहेत, या सगळ्याची गोळा बेरीज केली तर ४७ होते. या ४५ जागा इथून तिथे झाल्या असत्या तर ८५ वर काँग्रेस आणि ११० वर भाजपा गेली असती. आम्हाला पराभव मान्य आहे. त्याचे विश्लेषण करू.
बेंगलोरमध्ये पूर्वी असलेल्या १५ जागा वाढवून आता त्या १६ जागा झाल्या आहेत. केवळ जागा नाही वाढल्या तर २०१४ मध्ये
३४.११ टक्के मते होती यामध्ये वाढ होऊन आता ही मते ४२.११ यात म्हणजेच साडेआठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई भाजपा कार्यकर्त्यानी ठरवलं मुंबईत ३२ वरून ८२ जागा आणतो. पटेल आंदोलनाचे पीक असतानाही संपूर्ण जागा निवडून आणतो. याखेरीज बेंगलोरमध्येही आपली ताकद दाखवून देतो. ही भाजपची ताकद आहे. मी, प्रसारमाध्यमांना आवाहन करतो की, याची सत्यता तुम्हीच पडताळून पहा असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
समाजविघातक कृत्य सहन करणार नाही
(यावेळी आ. आशिष शेलार यांनी समाज माध्यमांवर व्हायरल झालेला एक व्हिडीओ दाखवून याबाबतची सत्यता मीडियाने पडताळून पहावी असे स्पष्ट केले.)
भाजप पराभूत झालं, यश मिळालं नाही तर नंगानाच आणि त्याबरोबर समाजविदारक कृत्यांची व्हिडिओ क्लिप कशी काढली जाते त्याचा आनंद कर्नाटकात साजरा केला. भाजपच्या झेंड्यावर गाय कशी कापली हे दाखविण्यात येत आहे. गाय कापून भाजपच्या झेंड्यावर तुम्ही उन्माद साजरा करणार असाल तर आणि त्या काँग्रेसबरोबर उद्धवजी तुम्ही बसणार असाल तर तुमचा निषेध करावा तेवढा कमी आहे. एका बाजूला मानवतामूल्य, प्राण्यांचं महत्व, पर्यावरणाचे महत्त्व आणि डोंबलाचा आरे वाचवला सांगता, उद्या तुमची सत्ता महानगरपालिकेत आली, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आली तर भाजपला विरोध करण्यासाठी त्या आरे जंगलामधील म्हशी आणि गाई कापायला तुम्ही कमी करणार आहात का? हा मुंबईकरांच्या मनातला प्रश्न आहे. आपणाला या सर्व गोष्टींचा सामना प्रामाणिकपणे काम करून करायचा आहे. आपल्याला खोलवर जाऊन काम करणं मा. मोदींच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं लाभार्थ्यांशी संपर्क करणं, ‘नौ साल बेमिसाल’ मोदीजींच्या जनसंपर्क अभियानात केंद्र सरकारचे सर्व विषय पोहोचवणं गरजेचे आहे. केवळ मतदारांच्या अधिकारांसाठी नाही तर प्राणीमात्रांच्या जगण्याच्या अधिकारांसाठीसुद्धा तुम्हाला आणि मला लढावं लागेल, असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
…म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारले
१९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२ मध्ये तर ही संख्या ७५ वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून झाले. त्या फायद्यावर ८४ चा आकडा गाठला. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६० वर आला असता, आज तुमच्यासमोर मी भाकीत करतो की … उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेत निवडणुकीत पन्नास चा आकडाही पार करू शकणार नाही. ही आकडेवारी त्याचा पुरावा आहे म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले. मुंबईकरांनी कधीच त्यांना आपल म्हणणं देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे… पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतले आणि मविआचे अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतील याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
राज ठाकरेंना कानपिचक्या
पंतप्रधान मोदींनी २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. मोदीजींचा देशातील प्रामाणिक नागरिकांवरचा हा भरोसा आहे. आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचं बोलल्यावर खरंच असेल असं मानण्याच काही कारण नाही. व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा आ. अॅड. आशिष शेलार यांनी दिला. २ हजाराच्या नोटेवरची बंदी ही धरसोडवृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे. आरबीआयचे ‘क्लीन नोट पॉलिसी’ हे धोरण आहे, हे धोरण चर्चेअंती झाले आहे. ते विविध बैठकांमध्ये सादर झाले. ज्यावर तज्ञांनी आपली मते मांडली आहेत, त्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. तुमच्या गावात तरी हा विषय आहे का? ज्यावेळी दोन हजाराची नोट बाजारात आली त्याचवेळी ही तात्पुरती व्यवस्था आहे असे आरबीआय आणि मोदीजींनी घोषित केले होते. ६ लाख ३२ कोटींच्या नोटा बाजारात होत्या त्यापैकी ३ लाख कोटींच्या जर चलनात असतील; जर व्यवस्थेत असतील तर उरलेल्या ३ लाख ४० हजार कोटींच्या नोटा कुठे लपल्यात हे शोधणे प्रामाणिकपणाचं काम आहे, हे जनतेला हवे आहे… चोर पकडले गेले पाहिजेत. जे सुटले आहेत त्यांना धरले पाहिजे आता हे राज ठाकरे यांना सांगा असेही ते म्हणाले. मोदीजी जे करतात ते प्रामाणिक माणसाच्या आयुष्यात त्याला जगण्याचं प्रामाणिकतेने स्थान मिळालं पाहिजे म्हणून करतात. टीका करणाऱ्यांच स्वागत तर आहेच पण कधी कधी असं वाटतं आपण काय होतो आणि आपण काय झालो हेही पाहणं गरजेचं आहे, असेही आ. अॅड. आशिष शेलार म्हणाले.
काय होतास तू काय झालास तू…
ते चित्र ज्यावेळी आम्ही टीव्हीवर वर्तमानपत्रात पाहिलं मविआची बैठक… सन्माननीय शरद पवार यांची होती. या खुर्चीच्या आजूबाजूला एकही खुर्ची नव्हती त्यानंतर सोफ्यांची रांग होती… या सोफ्यावर बसलेल्या उद्धवजींना पाहिलं आणि मला गाणं आठवलं ‘कोण होतास तू काय झालास तू…’ ज्यावेळी आमच्यासोबत होतात; त्यावेळी देशाचं नेतृत्व तुमच्याकडे येत होतं. आज आम्हाला सोडून गेलात तर केजरीवाल ते केसीआरपर्यंत सतत सगळीकडे जावं लागतय. आमच्याबरोबर होतात तेव्हा खुर्चीचा सन्मान होता. आता तुम्हाला सोफ्याच्या रांगेत बसावं लागतंय. आमच्याबरोबर होतात तेव्हा शिवतीर्थावर तुमच्या सभा व्हायच्या. बीकेसीची चार मैदाने भरायची. आम्हाला सोडून गेलात तर तीन पक्ष एक होऊनसुद्धा आम्ही जे मैदान पार्किंगसाठी वापरलं तिथे तुमची सभा होते. मुंबईकरांच्या प्रती आपलेपणा तुम्ही सोडला आहे आणि म्हणून आता ‘सरकार आपल्या दारी’ च्या माध्यमातून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर मुंबईकरांच्या समस्या गाऱ्हाणे ऐकून घेतात. पावसाआधी मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी नाल्यावर भारतीय जनता पार्टीची माणसं जातात. एसी घरात बसलेले आदित्य आणि उद्धव ठाकरे याचे उत्तर देतील का? तुम्ही का नाल्यावर आला नाहीत? राज्यात सरकार हवं म्हणून आक्रोश करताय मुंबईकरांच्या समस्या ऐकून घ्यायला तुम्ही रस्त्यावर दिसत नाहीत. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी १५१ चा आकडा भाजपा, शिवसेना, रिपाई आणि एनडीए भाजपा महापौराच्या नेतृत्वात दिसेल आणि उद्धवजी आणि त्यांचे सुपुत्र ईव्हीएममध्ये गडबड आहे का ? याचे क्लास करत बसतील हे चित्र मी आजच स्पष्ट करतो. त्या कामासाठी तुमच्या सगळ्यांची संपूर्ण ताकद लावा असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅड. आशिष शेलार यांनी केले.