पुणे– खडकवासला धरणा जवळ डोणजे, गोर्हे खुर्द याठिकाणी नऊ मुली पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून दोन बेपत्ता मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.खुशी संजय खुर्दे (वय 13, पाण्याच्या टाकीजवळ, सोळंकी लेआऊट, ता. बुलढाणा) शितल भगवान टिटोरे (वय 18, आंबोडा झरीझरी, ता. जि. बुलढाणा) ही मृत मुलींची नावे आहेत. सर्व मुली मूळच्या बुलढाण्याच्या असून गोरेखुर्द या गावात गोरे खुर्द या गावात बारशाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी 9 मुली होण्यासाठी उतरल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व नऊ मुली पाण्यात बुडाल्या. सुदैवाने 7 जणी वाचल्या मात्र दोघींचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त झालेल्या प्रर्थामिक माहितीनुसार, डोनजे परिसरात गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत आज सकाळी पोहण्यासाठी नऊ मुली पाण्यात उतरलेल्या होत्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने नऊ मुली पाण्यात बुडाल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली.
यावेळी जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत.याबाबतची माहिती हवेली पोलिसांना कळवताच ते घटनास्थळी दाखल झाले. तसेच पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन त्यांनी बेपत्ता मुलींचा पाण्यात शोध घेतला .
गोऱ्हे खुर्द येथे उदरनिर्वाहासाठी आलेल्या संजय लहाणे यांच्या घरी मांडव परातणीचा कार्यक्रम होता. त्यासाठी बुलढाणा व जळगाव येथून त्यांचे नातेवाईक आले होते. लहाणे खडकवासला धरणाच्या पाण्याच्या कडेला पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. सकाळी उठल्यानंतर मुलींनी पोहण्याचा हट्ट केला. सोबत आलेल्या वृद्ध महिलांनी मुलींना पाण्यात जाऊ नका असे सांगितले परंतु मुलींनी ऐकले नाही.पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने मिना संजय लहाणे यांच्यासह इतर सहा मुली पाण्यात बुडू लागल्या. काठावर बसलेल्या दोघींनी आरडाओरड केल्यानंतर सावडण्याच्या कार्यक्रमासाठी आलेले स्थानिक संजय माताळे, राजेंद्र जोरी, कालिदास माताळे,शिवाजी माताळे व रमेश भामे हे मदतीसाठी धावले.
संजय माताळे यांनी पाण्यात उडी घेऊन एक-एक करुन पाच जणींना पाण्याबाहेर काढले. राजेंद्र जोरी, कालिदास माताळे व इतरांनी बाहेर काढलेल्या मुलींच्या पोटातील पाणी बाहेर काढून तातडीने खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. हवेली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, हवालदार दिनेश कोळेकर व विलास प्रधान हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.
पीएमआरडीए चे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज माळी, किशोर काळभोर, सुरज माने, योगेश मायनाळे व ओंकार इंगवले या जवानांनी बुडालेल्या दोघींचे मृतदेह शोधून पाण्याबाहेर काढले