श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे व गीता धर्म मंडळाच्या पुढाकाराने आयोजन ; तब्बल ५० हून अधिक साधकांचा सहभाग
पुणे : नैनं छिद्रन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक : न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुत… या भगवद््गीतेतीचा सार असलेल्या या श्लोकासह संपूर्ण गीतेचे पठण लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात झाले. भगवद््गीतेची प्रार्थना, १८ अध्यायांचे पठण, गीता महात्म्य, गीतेची आरती आणि विष्णूसहस्त्रनाम पठणाने दत्तमंदिराचा परिसर भक्तीमय झाला.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२६ व्या वर्षी व गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भगवद््गीता ज्ञानयज्ञ सामुदायिक गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, विश्वस्त अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे, गीता धर्म मंडळाचे डॉ. मुकुंद दातार, डॉ. मुकुंद कोंढवेकर, अनुजा चोपडे, सुनिता फडके, विनया मेहेंदळे आदींनी आयोजन केले.
डॉ. मुकुंद दातार म्हणाले, गीता धर्म मंडळाच्या स्थापनेला १०० वर्षे झाली असून लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून याचा प्रारंभ झाला. शताब्दीनिमित्त गीता घरोघरी हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. सर्वांनी गीता शिकून त्याचे पठण करावे, हा आमचा प्रयत्न आहे. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात देखील तीन तास गीता पठण करीत ५० साधक सहभागी झाले आहेत.
युवराज गाडवे म्हणाले, भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ म्हणून ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे याचे पठण मंदिरात करण्यात आले.