सर्वसामान्य पुरग्रस्तवासीयांच्या घरांवर
‘ बुलडोझर’ ,धनदांडग्यांना ‘अभय’
‘प्रशासक राज’च्या मनमानीचा सुट्टीच्या दिवशी फटका : पर्वती दर्शनमधील हजारो नागरिक आक्रमक
पुणे-पुरग्रस्तांचे पुनर्वसन झाले, गावठाण म्हणून पालिकेत ठरावही झाला मात्र कुटुंबांत सदस्यांची संख्या वाढली ;पण आजतागायत नावावर घरेही नाहीत की दुरुस्ती, वाढीव बांधकामाबाबत निर्णयही नाही असे असताना जमापुंजीतून आम्ही थोडेफार वाढीव बांधकाम केले मात्र त्यावर सुट्टीच्या दिवशी अचानक यंत्रणा कामाला लावून आमच्या घरांवर पालिका आयुक्तांनी तडकाफडकी ‘बुलडोझर’ फिरवला मग ही तत्परता आयुक्त शहरात बेकायदेशीररित्या उभारलेल्या रूफटॉप हॉटेलसह अनधिकृत बांधकामे केलेल्या बलाढ्य व्यावसायिकांवर दाखवतील का? अशा शब्दात पर्वती दर्शन येथील पूरग्रस्त वासीयांनी टाहो फोडला.
पर्वती दर्शन येथील पूरग्रस्त वसाहतीत रविवारी पालिका प्रशासनाने अचानक अतिक्रमण विरोधी कारवाई केली. मात्र प्रशासक तथा पालिका आयुक्त या भागातून जात असताना त्यांनी याठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे फर्मान सोडले आणि अर्धा तासात सुट्टीच्या दिवशी सर्व यंत्रणा जागेवर पोहचली आणि कारवाई सुरु केली असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पूरग्रस्त वसाहतीत आम्ही अनेक वर्षे राहत आहोत.तसेच गावठाण म्हणूनही पालिकेत ठराव झालेला आहे. पुनर्वसनात ही घरे आम्हाला मिळाली मात्र अद्याप ही घरे नावावर झालेली नाहीत. आज आमच्या कुटुंबात सदस्यांची संख्या वाढल्याने घरे अपुरी पडत आहेत. त्यात अनेक घरांची डागडुजी तसेच थोडेफार वाढीव बांधकामे कुटुंबाची गरज लक्षात घेऊनच जमापुंजीतून केली.असे असले तरी पूरग्रस्त वसाहतीतील बांधकामांबाबत पालिका प्रशासनच काय जिल्हाधिकारी कार्यालयातकडेही नियमावली नाही. असे असतानाही प्रशासक तथा आयुक्तांच्या ‘आले मनात’ यानुसार मनमानीने आमच्या घरांवर सुट्टीच्या दिवशी कशी काय कारवाई ? असा संतप्त सवालही नागरिकांनी केला आहे.
दरम्यान याबाबत महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनीही पर्वती दर्शन पूरग्रस्त वसाहत संदर्भात गावठाणाचा दर्जा देण्याबाबत पालिकेत यापूर्वीच ठराव झालेला असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, पूरग्रस्त वसाहतीतील रहिवाशांनी किती दिवस परवड सहन करायची यावर विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळी इथे लोकांचे पुनर्वसन झाले ,त्यावेळी असणारी कुटुंबे आणि त्यांची सदस्य संख्या मात्र आज वाढली आहेत. साहजिकच घरे अपुरी पडत असल्याने कष्टकरी असणाऱ्या या वर्गाने जमापुंजीतून उभारलेली वाढीव बांधकामाची घरे जमीनदोस्त करण्यापेक्षा कोणता तोडगा काढता येतो हे पाहणे महत्वाचे आहे.त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पूरग्रस्त वसाहतीतील रहिवाशांच्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासंदर्भात निवेदन देणार असून पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असेही आबा बागुल म्हणाले.