पुणे, दि. 3: जल जीवन मिशन या केंद्रशासनाच्या महत्वकांक्षी योजनेत जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत; त्यासाठी जिल्ह्यातील प्रलंबित कामांबाबत कृती आराखडा तयार करुन प्रलंबित कामे मिशन मोडवर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जल जीवन मिशन ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असून केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे कामे करावीत. संबंधित अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवर सुरु असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी पाहणी करावी. मान्सूनच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोहिमेअंतर्गत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करावीत.
अभियानातील कामांसाठी जलसंपदा, महसूल, वन, रेल्वे, आणि इतर विभागाकडील जागेच्या प्रलबिंत भूसंपादनाचे प्रस्ताव मार्गी लावावेत. प्रलंबित सरकारी जागांबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी लवकरात लवकर पाठवावे. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, जिल्ह्यात १ हजार २२४ पाणीपुरवठा योजना मंजूर असून १ हजार १३६ योजनांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. १ हजार २१ योजनांची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रकल्पाअंतर्गत रस्ते आदी कामे सुरु असून पाणीपुरवठा योजनांची कामे करताना या बाबीचाही विचार करावा. कामे करतांना प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करावा. कंत्राटदारांनी मे महिन्याअखेर दिलेली कामे पूर्ण करावीत. याकरीता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
श्रीमती कडू यांनी तालुकानिहाय योजनांच्या माहितीचा आढावा घेतला.
कार्यकारी अभियंता श्री. खताळ यांनी जल जीवन मिशन (हर घर जल) अंतर्गत सुरु असलेल्या कामाबाबत माहिती दिली. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.