मुंबई- उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का, याची चर्चा या दाव्याने रंगली आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे सावंत म्हणाले. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधल्यानंतर हा दावा केला. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीय.
खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 भाविकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हटवणार. त्यांच्यावर भाजपचे हायकमांड नाराज आहे, असा प्रश्न उदय सामंत यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की, उद्धव ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व तेरा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वीस आमदार संपर्कात आहेत. काँग्रेसचे अनेक बडे नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात तोडफोडीचे राजकारण रंगणार का, असा सवाल निर्माण केला जात आहे.
उदय सामंत यांनी संजय राऊत हे विद्वानांचे महामेरू आहेत, असे म्हणत त्यांचा समाचार घेतला. सामंत म्हणाले की, जगातले सगळ्यात शहाणे आणि विद्वानांमध्ये संजय राऊतांची गणना होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणे सोडून दिले आहे. त्यांसमोर स्पर्धक म्हणून एकही विद्ववान नाही. जगात सगळ्यात जास्त अक्कल राऊतांना आहे. त्यांच्यावर आता काय बोलणार. मात्र, त्यांनी सरकारी कागद दाखवून शहापणा दाखवू नये, असे शब्दांत त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे समजते. या नाराजीतून ते सुटीवर होते. शिंदे म्हणावे तसे काम करत नाहीत, अशी भाजप हायकमांडला वाटते. सत्तासंघर्षाचा निकाल विरोधात लागला, तर शिंदे यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चा सुरू आहेत