पुणे, 20 एप्रिल 2023
राष्ट्रीय स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने पुण्यातील गणेशखिंड इथल्या केंद्रीय विद्यालयात चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . पत्र सूचना कार्यालयाच्या सहकार्याने वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन विभागात पार पडलेल्या या स्पर्धांमधून सुमारे 120 विद्यार्थी – विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यालयाच्या प्राचार्या शबाना खान आणि पुण्यातील पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अय्यंगार यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पुरस्कार वितरण करण्यात आले .
यावेळी बोलताना प्राचार्या खान यांनी मुलांना आपला वर्ग , शाळा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने स्वच्छतेच्या बाबतीत हे कर्तव्य पार पाडले तर देश स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे यावेळी प्रदर्शन सादर करण्यात आले.उपस्थित विद्यार्थ्यांपैकी प्रातिनिधिक स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला . शाळेचे उपमुख्याध्यापक कनाराम चौधरी, कला शिक्षक अलीम बागवान आणि उज्वल अवारे यांचे या स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले.