पुणे दि. १२: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पुणे यांच्यावतीने भिमाशंकर हॉल, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) एस. डी. हंगे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सं. ज. शेंडे, कल्याण संघटक जी. एस. शिंदे, जिल्हा सैनिक कुटुंब संरक्षण समिती सदस्य, माजी सैनिक विधवा पत्नी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी पोलीस विभागाला माजी सैनिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
माजी सैनिकांच्या तक्रारी त्वरीत निराकरण करण्यात याव्यात व पुणे जिल्हा सैनिक कुटुंब संरक्षण समिती सदस्यांना पोलीस अधीक्षक यांच्या स्वाक्षरीने ओळखपत्र वाटप करण्यात यावे अशी विनंती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (नि.) हंगे यांनी केली.
0000