पुणे-पुण्यात रविवार दि. ९ एप्रिल रोजी विंटेज अँड क्लासिक कार्स, मोटारसायकल व स्कूटर रॅलीचे भव्यतेने आयोजन करण्यात आले आहे. रेस कोर्स येथील टर्फ क्लब येथून सकाळी ९.०० वाजता या रॅलीचा प्रारंभ होईल आणि आणि १५ किमीची ही रॅली गोळीबार मैदान – सारसबाग – दांडेकर पुल – लाल बहादूर शास्त्री मार्ग – गरवारे पूल – कृषी महाविद्यालय उड्डाणपूल – जुना बाजार रोड – जिल्हा परिषद – हॉलीवूड गुरुद्वारा रोड – परत येऊन टर्फ क्लब येथे संपेल अशी माहिती विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लबचे चेअरमन नितीन डोसा (मुंबई) यांनी पत्रकार परिषदेस दिली. पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व माजी पोलीस आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सुभाष.बी.सनस विंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस, वि.सी.सी.आयचे पदाधिकारी व विंटेज कार्सचे मालक उपस्थित होते. पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या रॅलीमधील सर्वोत्कृष्ट व्हिंटेज कारला विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.
नितीन डोसा पुढे म्हणाले की, नुकतीच मुंबईत अशी रॅली पार पडली व त्यास फार मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील या रॅलीत 125 प्रवेशिका आल्या आहेत ज्यामध्ये अतिशय मौल्यवान जुन्या 70 ते 80 विंटेज व क्लासिक कार्स आणि सुमारे 30 ते 40 विंटेज स्कूटर्स व मोटारसायकलस असतील. पुण्या प्रमाणेच मुंबईहून ही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या रॅलीमध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूड स्टार्सच्या व्हिंटेज आणि क्लासिक गाड्या तसेच सुभाष सणस यांच्या मालकीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला, हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझ, अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज, विनोद खन्ना यांची 2 डोअर सिल्व्हर कलर मर्सिडीज व इतर सेलिब्रिटीज यांच्या विंटेज कार्स तसेच ‘बॉबी’ फेम राजदूत मोटारसायकल अशा अनेक वाहनांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पेबल्स बीच यूएसए विजेता एल्विसची 1933, शेखर चवरेकर यांची सर्वात जुनी कार 1919 ओव्हर लँड, 1956 ची डॉज, १९३८ ची सर्वात जुनी मोटारसायकल नॉर्टन 500 इत्यादी प्रदर्शित केले जातील. रॅलीदरम्यान ऑस्टिन 7 ही भारतातील सर्वात जुनी रॅली चालक पुण्यातील डॉ. प्रभा नेने चालवणार आहेत. रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, ऑस्टिन, फोर्ड व इतर फॉरेन कार्स यांचा यात समावेश आहे. धनंजय बदामीकर, डहाणूकर, इव्हान पूनावाला, झहीर वकील, साबळे कुटुंब अशा अनेकांच्या संग्राह्तील या विंटेज व क्लासिक कार्स आहेत. पुणेकरांनी यावे आणि या विंटेज अँड क्लासिक कार रॅलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. नितीन डोसा यांनी केले आहे.