पुणे- पैशांअभावी कोणताही रुग्ण उपचारा़ंपासून वंचित राहू नये यासाठी खडकी छावणी परिषद हद्दीतील नागरिकांना पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
या मागणीचे निवेदन आमदार शिरोळे यांनी आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून दिले. खडकी छावणी परिषद हद्दीतील सामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे आर्थिक कारणाने शक्य होत नाही. त्यांना उपचारांपासून वंचित राहावे लागते. यापुढे त्यांच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ खडकीतील नागरिकांना मिळायला हवा, असे या निवेदनात म्हटले आहे.
खडकी छावणी परिषद हद्दीत सुमारे लाख, सव्वालाख लोकसंख्या आहे. संरक्षण खात्यातील चतुर्थ श्रेणी कामगार, अगदी छोटे व्यावसायिक यांची संख्या तेथे खूप आहे. छावणी परिषदेला लागूनच महापालिकेची हद्द आहे. महापालिका हद्दीनजीकच्या लोकांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा. खडकीसाठी आपण पाणीपुरवठा करतो. तिथे पीएमपीएलची बससेवा आहे. या सेवा आपण देतोच तरी, येथील नागरिकांना शहरी गरीब योजनेतून आरोग्य सेवाही द्यावी. त्यांची ती गरज आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.