आजच खर्या अर्थाने विश्वशांती ची गरज डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मत;
एमआयटी डब्लूपीयू तर्फे डॉ.विजय भटकर आणि डॉ. स्कॉट हॅरियाट यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे-आजची परिस्थीती ही अत्यंत भयावह आहे. ही परिस्थीती पाहता जुन्या काळापेक्षा आजच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत असणार्या काळातच खर्या अर्थाने विश्वशांतीची गरज आहे. असे मत जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी) व एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे तर्फे जागतिक कीर्तीचे संगणक तज्ज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर आणि अमेरिका येथील महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंटचे कुलगुरू डॉ.स्कॉट हॅरियट यांना पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड,
थोर तपस्वी श्रीकृष्ण कर्वे उर्फ कर्वे गुरुजी, जे. के. लक्ष्मीपत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रोशनलाल रैना, शारदा ज्ञानपीठाम्चे अध्यक्ष पंडित वसंत गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, प्रा. डी.पी. आपटे, डॉ. एल. के. क्षीरसागर हे उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “ विज्ञान आणि अध्यात्म या दोघांनी एकत्र येत संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करणे गरजेचे आहे. आणि हे केवळ आपला भारत देशच करू शकतो. त्यामूळे त्या उद्देशाप्रत पोचण्यासाठी आज प्रत्येक व्यक्तीने आपापल्या ध्येयाप्रती अत्यंत प्रामाणिक असणे गरजेचे आहे. ”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “ संत वृत्तीचे शास्त्रज्ञ म्हणून डॉ. विजय भटकर आणि स्कॉट हॅरियाट यांचा उल्लेख करावा लागेल. खरे म्हणजे राष्टृाची आणि भाषेची बंधने ओंलाडून जाणारे त्यांचे कार्य आहे. ”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. विजय भटकर म्हणाले, “ आजच्या काळात विज्ञान निश्चितच महत्वाचे आहे. त्यातच आता तंत्रज्ञानाची भर पडली आहे. मात्र आज या विज्ञान व तंत्रज्ञानापेक्षा अधिक गरज अध्यात्माची आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे तुम्हाला जगाचे, विश्वाचे भौतिक ज्ञान देते पण अध्यात्म तुम्हाला जगण्याचा अर्थ शिकवते. ”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. स्कॉट हॅरियाट म्हणाले, “ जेव्हा तुम्ही निसर्गाला सोबत घेऊन एखादी कृती करता तेव्हांच त्या कृतीला सफलतेचा भाव असतो. ज्या क्षणी तुम्ही निसर्गाचा व पर्यायाने संपूर्ण समाजाचा देखील विचार करेनासे होता, तेंव्हा तुम्ही कितीही बौद्धिके देत असलात तरी तुम्हाला कोणीही बुद्धीवादी म्हणणार नाही. त्यासाठी असणारा विवेकच तुम्हाला बुद्धीवादी ठरवेल. संपूर्ण जगात विवेका इतके महत्त्वाचे दुसरे काहीच नाही. ”