जागतिक स्तरावर भारतीयांशी संवाद घडविण्याची सुरवात होत आहे – डॉ. डेनिसी हफ्तालिन यांचे प्रतिपादन ; एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा पहिला वर्धापनदिन साजरा
पुणे, दि.11 ऑगस्ट :“एमआयटी-एडीटीसारख्या विद्यापीठामुळे जागतिक स्तरावर भारतीयांचा संवाद घडविण्यास मदद होईल,”असे प्रतिपादन साल्ट लेक कम्युनिटी कॉलेजच्या अध्यक्ष डॉ. डेनिसी हफ्तालिन यांनी व्यक्त केले.
राजबाग लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून वेस्ट मिन्स्टर कॉलेजचे अध्यक्ष डॉ. स्टीफन मॉर्गन, उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचर्ड आर. नेल्सन, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी हे उपस्थित होते. तसेच, सौ.उषा विश्वनाथ कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड-चाटे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुनिल राय व कुलसचिव डॉ.महेश देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या वर्षिक अहवालाच्या सीडी व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. डेनिसी हफ्तालिन म्हणाल्या,“ जागतिक शांततेच्या हेतूने आम्ही कम्यूनिटी कॉलेज सुरू केले आहे. त्याद्वारे वैश्विक संवादाचे कार्य आम्ही करीत असतो. तेच कार्य सर्व जगातल्या विद्यापीठांनी व विचारवंतानी केले, काही लोक फक्त स्वप्न पाहतात आणि काही लोक फक्त काम करतात. त्यात डॉ.ए.पी.जी अब्दुल कलाम यांनी स्वप्न पाहिले व ते साकार केले. जागतिक दृष्टिच्या विद्यार्थ्यांनी आज स्वप्न पाहण्याबरोबरच शिक्षण घेणे महत्वाचे आहे. तर त्या द्वारे संपूर्ण जगात युद्धे थांबविण्यास व शांती प्रस्थापित करण्यास निश्चितच मदद होईल. खरे म्हणजे जगातील सर्वसामान्य जनतेच्या मनात हाच भाव आणि विचार आहे. आम्ही फक्त त्याला सुघटित स्वरूप देत आहोत.”
डॉ. रिचर्ड आर. नेल्सन म्हणाले,“ दर दोन वर्षात तंत्रज्ञानामध्ये दुपटीने वाढ होत असते. जीवनात प्रत्येक पाऊलावर एखाद्या व्यापार्यासारखा विचार करावा. आपली गुंतवणूक किती व आपला फायदा किती झाला याचा आढावा घ्या. त्यानुसार स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवीत रहा. आवड आणि जिज्ञासा हे कधीही उच्च बुद्धांकापेक्षा जास्त महत्वाचे आहे कारण त्यामधून इच्छाशक्ती निर्माण होते. त्यातूनच ध्येय साध्य होते.”
डॉ. स्टीफन मॉर्गन म्हणाले,“ येथील वैश्विक शिक्षण पद्धती मी जेव्हा पाहिली, तेव्हा त्या पद्धतीची जागतिक शांततेला निश्चितच मदत होईल. अशी माझी खात्री झाली. आमच्य उटाह विद्यापीठात आम्ही क्रीडा क्षेत्राला अतिशय प्रोत्साहन देतो अर्थात भारताप्रमाणे क्रिकेटला तेथे स्थान नाही. या धोरणामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्तीची जोपासना होते. त्यातून विजिगीषु मनोवृत्ती तयार होण्यास उत्तेजन मिळते. ज्या भारतीय पद्धतीने आमचे स्वागत झाले, ते पाहुण मी भारावून गेलो.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृती ही परंपरेशी जुळलेली असुन येथे वसुधैव कुटुंबकमची परंपरा आहे. दहशतवाद, धर्म वेडेपणा व जातीयता इ. समस्यांनी मानव जात ग्रस्त आहे. मानवकल्याण साधावयाचे असेल तर त्यासाठी मनाची व विचारांची शुद्धता व त्यानुसार आचरण आवश्यक आहे. विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयानेच विश्व शांती नांदेल. ज्ञानेश्वर-तुकाराम हे भारतातील संतांचे प्रतीक रूप आहे. म्हणून आम्ही त्यांची भक्ती करतो. ”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले,“ येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. या संस्थेच्या छत्राखाली सृजनशील उपक्रम चालविले जातात. आमच्या विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना अशा प्रकारे घडविले जाते की ते सामाजिक समस्या सोडविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील. विद्यापीठ परिसरातील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या असल्यामुळे भारतातील सर्वोत्कृष्ठ शैक्षणिक परिसरामध्ये याचा समावेश होतो.”
डॉ.सुनील राय म्हणाले,“ भारतात हे एक एकमेव विद्यापीठ आहे, जेथे दिल्या जाणार्या सर्वोत्कृष्ट शिक्षणामुळे या वर्षी चार हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. येणार्या काळात हे विद्यापीठ जागतिक स्तरावर नावलौकिक प्राप्त करेल.’
प्रा. पायल शहा व प्रा. स्वप्निल शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड – चाटे यांनी आभार मानले.