पुणे: श्री क्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या तीरावर घाटाची निर्मिती केली व १४५ फूटाच्या गरूड स्तंभ आणि भागवत धर्माची पताका उभारल्यामुळे आळंदीच्या वैभवात भर पाडल्याबद्दल विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमायटी चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा .कराड व त्यांच्या पत्नी सौ.उर्मिला विश्वनाथ कराड यांचा आळंदी नगरपालिका आणि आळंदीकरांच्या वतीने नगराध्यक्षा सौ.वैजंताताई अशोक उमरगेकर व नगरपालिकेचे सर्व सदस्य यांच्या हस्ते विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्यावेळी पुणेरी पगडी परिधान करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री.बबनराव पाचपुते, ह.भ.प.श्री.डॉ. तुकारामबुवा गरूड (ठाकुरबुवा) दैठणेकर, श्री. बाळासाहेब रावडे, डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, पं.उद्धवबापू आपेगावकर , अशोक उमरगेकर, आळंदी नगरपालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले की,“महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूर येथील पांडूरंगाची मूर्ति सोन्याची करण्याचा माझा संकल्प आहे. सुवर्ण मंदिर व कोलार येथील ५५० किलोची सोन्याच्या मंदिराप्रमाणेच आता सर्व वारकर्यांना मिळून पंढरपूरच्या विठूरायाला सोन्याचे करायचे आहे. पांडूरंगाला सजवल तर त्यात वाईट काय आहे? असा प्रश्न त्यांनी आळंदीकरांबरोबरच वारकर्यांना विचारला. तसेच, तीर्थक्षेत्र आळंदी बरोबरच पंढरपूर येथे १८ घाटाची निर्मिती करावयाचा संकल्प आहेे. भविष्यात आळंदी- देहू हे विश्वशांतीचे केंद्र बनेल. कालानुरूप वारकरी संप्रदायाचे कार्य हे जगभर पसरेल. भविष्यात वारकरी संप्रदाय हा जगाला सुख, समाधान व शांतीचा संदेश देईल. २१वें शतक हे भारताचे असेल.”
श्री.मा. बबनराव पाचपुते म्हणाले,“आळंदी येथील स्वच्छतेची सुरूवात डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली. त्या वेळेस झालेली टीका टिप्पणी याकडे त्यांनी लक्ष दिले नाही म्हणून आज या तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी वारकर्यांना सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.”
श्री. संजय देशमुख यांनी वारकरी सांप्रदायाच्या वतीने डॉ.विश्वनाथ कराड यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बनवावे, अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. याकरिता समस्त वारकर्यांनी संमती दर्शविली आहेे.
ह.भ.प.श्री.डॉ. तुकारामबुवा गरूड (ठाकुरबुवा) दैठणेकर म्हणाले,“मानवी जीवनाचा हेतू संत संगतीचा असेल तरच जीवनाला खरी दिशा मिळते. मानवी जीवनातील सर्वात मोठी संधी म्हणजे ईश्वर दर्शन होय. म्हणून वारीच्या प्रस्थानाला विशेष महत्व आहे. संसाराची आसक्ती सोडून भगवंताकडे जावे त्यातच संपूर्ण जीवनाचा सार आहे.”
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळ्यानिमित्त युनेस्को अध्यासना अंतर्गत तीन दिवसीय लोकशिक्षणपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपात ह.भ.प.श्री.किसन महाराज साखरे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. श्रीमती गोदावरीताई मुंडे, श्री. रमेशबुवा शेनगावकर, श्री. काशीरामबुवा इडोळीकर व श्री. दिगंबरबुवा कुटे यांच्या सांप्रदायिक संगीत भजानाच्या कार्यक्रमाने या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप झाला.
एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांचा आळंदीकरांनी केला भव्य नागरी सत्कार
Date: