पुणे : जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासना मार्फत पालखी मार्गावर अन्नसुरक्षा व स्वच्छता अभियाना बाबत जनजागृती करण्यासाठी फिरता प्रशिक्षण वर्ग चालवण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गाचे उद्धघाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
यावेळी अन्न औषध विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई, सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे, संपत देशमुख,संजय शिंदे,अर्जुन भुजबळ, अन्य अन्नसुरक्षा अधिकारी,कोकाकोला इंडियाचे संदीप बोराळकर, सुनील अडसुळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
उदघाटनानंतर मंत्री बापट यांच्या हस्ते खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हातमोजे, कॅप, याबरोबरच लाल आणि निळ्या रुमालाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी खाद्यपदार्थ विक्रेते आणि दिंडीत स्वयंपाक करणाऱ्या महिलांशी चर्चा करून त्यांना स्वच्छतेचे निकष पाळण्याच्या सूचना केल्या.
प्रतिवर्षी आषाढ वारीच्या निमित्ताने लाखो भाविक आळंदी येथे जमा होत असतात. त्यामुळे येथे अनेक खाद्यपदार्थाचे स्टॉल उभा रहात असतात. या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर काहीवेळा स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत. यामुळे अनेक वेळा या भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हे टाळण्यासाठी पुण्याच्या अन्न औषध प्रशासन व कोका कोला इंडिया प्रा. लि कंपनीच्या संयुक्त विद्यमाने एका बस मधून फिरता प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आला आहे. या बस मध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षाअधिकारी व कोका कोला इंडिया कंपनीचे स्वयंसेवक मिळून अन्न सुरक्षा व स्वच्छतेबाबत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आळंदी ते नीरा या वारी मार्गावर जाणारी ही बस वारकऱ्यांच्या एक दिवस अगोदर जाऊन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मार्गदर्शन करणार आहे.