पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत शनिवार, दि. २४ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २३वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी डब्ल्यूपीयू कँपसमधील संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमालेमागील प्रमुख उद्देश आहे.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील.
शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. या समारंभासाठी भारत सरकारचे इटलीतील माजी राजदूत श्री. बसंत कुमार गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, दि. २४ नोव्हेंबर ते शुक्रवार, दि. ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सायंकाळी ४.३० वाजता होणार्या व्याख्यानमालेत सुप्रसिध्द विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. हनिफ खान शास्त्री व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण (गीता आणि कुरानामधील साम्य) बेंगलोर येथील स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थानचे प्राध्यापक व सैध्दांतिक भौतिकशास्त्रज्ञ डॉ. अलेक्स हॅन्की (ॐ = E = Mc2 ), भटके व विमुक्त जातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्री. दादा इदाते (जे का रंजले गांजले), सुप्रसिध्द पत्रकार व विद्वान श्री. गोपाल मिश्रा (भारतीय राज्यघटनेसमोरील आव्हाने) व महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त सचिव (सेवा) श्री. सीताराम कुंटे ( सेवा परमो धर्म:) अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच रविवार, दि. २५ नोव्हेंबर ते गुरुवार, दि. २९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत रोज सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत सकाळचे सत्र पार पडणार आहे. यामध्ये सुप्रसिध्द गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, कार्डिऑलॉजि सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. जगदीश हिरेमठ, सुप्रसिध्द विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्री. अभय जगताप, सिध्द योगा आश्रमच्या संस्थापिका व शांतीदूत स्वामी राधिकानंद सरस्वती, नाशिक येथील एम एबी अॅव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक व स्तंभलेखक श्री. मिलिंद भारदे, सुप्रसिध्द लेखक, विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्री. गिरीष दाबके, दैनिक लोकमतचे संपादक श्री. प्रशांत दीक्षित, प्रख्यात तत्त्वज्ञ व विचारवंत, माजी सनदी अधिकारी श्री. श्याम देशपांडे, हिमालयातील स्वामी योगी अमरनाथजी व दीक्षित डाएटचे संस्थापक व जगप्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित या मान्यवरांची विश्वशांती, संस्कृती व प्रबोधन इत्यादी विषयांवर व्याख्यानांची विशेष कार्यशाळाही आयोजित केली आहे.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम हे या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये दि. २५ नोव्हेंबर ते दि. २९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत माईर्स एमआयटी संकुलातील व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी अंतर्गत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचेही आयोजन योगाचार्य श्री. मारूती पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. योगासन वर्ग आयोजित करणारी ही एकमेव शैक्षणिक संस्था आहे.
सदरील सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्ही सत्रातील व्याख्यानमाला विनामूल्य असून त्या सर्वांसाठी खुल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, अशी संयोजकांची अपेक्षा आहे.
अशी माहिती विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.राहुल विश्वनाथ कराड व २३व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे यांनी दिली.