पुणे- पुण्यातील इंडियाआर्ट गॅलरीचे संचालक आणि छायाचित्रकार मिलिंद साठे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत मुंबईतल्या नेहरु सेंटर आर्ट गॅलरी (वरळी) येथे आयोजित करण्यात आले आहे.
जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य (ता. १९ ऑगस्ट) साधून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात नाना पालकर स्मृती समितीसाठी निधी संकलित करण्यात येणार आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना या समितीच्या वतीने निवास, भोजन व प्रवासाची सुविधा पुरविली जाते.
श्री. साठे यांनी अनुभवलेल्या विविध प्रसंगावर गोष्टी रुपात भाष्य ही करण्यात आले आहे. ही छायाचित्रे पाहताना आनंद, आश्चर्य, तन्मयता, एकांत, करुणता अशा विविध भावना अनुभवता येतील. प्रदर्शनात ६३ छायाचित्रे लावण्यात आली आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील.