मंगेश तेंडुलकरांची व्यंगचित्रे कायम प्रेरणा देतील -पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला
पुणे-मंगेश तेंडुलकरांसारखा सामाजिक संदेश देणारा व्यंगचित्रकार होणे नाही,या क्षेत्रात नवनवीन चित्रकार येतील पण तेंडुलकरांच्या इतके सामाजिक विषयांवर व्यंगचित्रे काढणे त्यांना कितपत जमेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे,असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काढले.तेंडुलकर कुठे ही गेलेले नाहीत ते आपल्यातच आहेत आणि त्यांनी ट्राफिक विषयावर काढलेले व्यंगचित्र कायम प्रेरणा देत राहतील असे ही त्या म्हणाल्या.ते पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी मला सांगितले कि मी व्यंगचित्रकार आहे आणि मी वाहतूक समस्येवर व्यंगचित्र काढतो,तेव्हा मला त्याचे विशेष वाटले,
तेंडुलकर कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या मंगेशजींच्या व्यंगचित्रांच्या ९० व्या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोहिनूर ग्रुपचे संचालक विनित गोयल,श्रीमती स्नेहलता तेंडुलकर,त्यांची कन्या वंदना,त्यांची नातं श्रावणी,मंजुश्री ओक,संदीप खर्डेकर,धनंजय देशपांडे,आनंद सराफ,शाहीर हेमंत माळवे,गुरुसिद्धय्या स्वामी,सौ शशी स्वामी,सुनंदा जप्तीवाले,इ मान्यवर उपस्थित होते,
यावेळी तेंडुलकर स्ट्रोक्स या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ही करण्यात आले,या पुस्तकासाठी कोहिनूर ग्रुप चे विनीत गोयल यांनी सहकार्य केले आहे,यावेळी बोलताना विनीत गोयल म्हणाले ” हे प्रदर्शन बघताना प्रत्येक व्यंगचित्रात एक कथा दडलेली आहे असे दिसून येते आणि तेच वैशिष्ट्य ओळखून आम्ही सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे ठरविले “
यावेळी मंगेश तेंडुलकरांना त्यांच्या सर्व कार्यात सहकार्य करणाऱ्या व तेंडुलकर स्ट्रोक्स पुस्तकाच्या प्रकाशिका मंजुश्री ओक,क्रीएटीव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,कलाकार धनंजय देशपांडे,श्री व सौ स्वामी यांचा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हे प्रदर्शन बाल गंधर्व कलादालन येथे शनिवार,रविवार आणि सोमवार सकाळी १० ते रात्रौ ८ खुले राहणार आहे.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वंदना तेंडुलकर यांनी केले तर धनंजय देशपांडे यांनी आभार मानले.