भोपाळ–
महाराष्ट्राच्या अन्वर शेख व उस्मान अन्सारी यांनी उपांत्य फेरी धडक मारत मुष्टीयुद्ध स्पर्धेत दोन पदके निश्चित केली.
तात्या टोपे क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या ४८ किलो गटात अन्वर याने मध्य प्रदेशच्या लोकेश पाल याचा ५-० असा पराभव केला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक ठोसे व उत्कृष्ट बचाव अशा दोन्ही तंत्रांचा कल्पकतेने उपयोग केला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही. अठरा वर्षाचा हा खेळाडू अर्जुन पुरस्कार विजेते व माजी ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथम सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे त्याची सिदरा व साद ही भावंडे देखील मुष्टियुद्ध खेळातच करिअर करीत आहेत. या भावंडांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.
उस्मान याने ५१ किलो गटात हरियाणाच्या गंगा कुमार याचा चुरशीच्या लढतीनंतर ४-१ असा पराभव केला. ही लढत शेवटपर्यंत रंगतदार झाली मात्र उस्मान याने अतिशय शांत चित्ताने आपल्या प्रतिस्पर्ध्यास चांगला प्रतिकार करीत विजयश्री खेचून आणली. तो बारावी येथे शिकत असून सध्या औरंगाबाद येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत सनी गहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. त्याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट स्पर्धेत रुपेरी कामगिरी करतानाच सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचाही किताब मिळवला आहे. त्याखेरीस त्याने राष्ट्रीय युवा स्पर्धेत रौप्य पदक तर कुमारांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तो मुंबई येथील बीएमसी प्रशालेचा विद्यार्थी आहे.