विमाननगर: वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. विमानगर येथे काल (ता. २७) ३०० सफाई कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगितले जाते.
या मोहिमेंतर्गत, विमाननगर भागातील विविध रस्त्यांची, फुटपाथ तसेच गटार इ. स्वच्छता करण्यात आली. तसेच, स्वच्छतेविषयी जनजागृतीदेखील केली. “एक लोकप्रतिनिधी व नागरिक म्हणून आपला परिसर, आपला मतदारसंघ, आपले शहर स्वच्छ ठेवणे कर्तव्य समजतो. महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज अशा अनेक थोरांनी स्वच्छतेचे महत्त्व आपल्या कार्यातून, विचारांतून आपल्यासमोर मांडले आहेत. त्याच मार्गावर चालत स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊयात व येणाऱ्या काळात विविध मोहिमा राबवून आपले शहर स्वच्छ व सुंदर करूयात, असा संकल्प या मोहिमेत बापूसाहेब पठारे यांनी केला.
स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने युवा नेतृत्व सुरेंद्र पठारे तसेच महापालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक मुकुंद घम, समीर खुळे, सचिन गवळी, विनायक भोरडे, संदेश रोडे, राजेश आहेर, हनुमंत साळवी, सुषमा मुंडे उपस्थित होते.
मोहिमतील सफाई कर्मचाऱ्यांचे पठारे यांनी आभार मानले. यावेळी त्यांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. “येणाऱ्या काळात बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून मतदारसंघात स्वच्छतेच्या दृष्टीने अशाच पद्धतीच्या विविध मोहिमा, उपक्रम राबवण्यात येतील,” असा विश्वास सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.