पुणे दि.२१: केंद्र शासनाच्या जनकल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा सुरू असून या यात्रेच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात उपल्बध करुन देण्यात आलेली आरोग्य तपासणीची सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे.
या दोन्ही शहराच्या विविध भागात एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून सकाळ व दुपारच्या सत्रात प्रत्येकी एका ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. यात आरोग्य तपासणी, क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमबाबत जनजागृती, आयुष्मान भारत कार्ड नोंदणी आदी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रक्तदाब, मधुमेहासह इतर सामान्य आरोग्य तपासणीची सुविधादेखील करण्यात आली आहे. गरजू व्यक्तींसाठी जागेवरच आरोग्य तपासणीची सुविधा विशेष ठरली आहे.
यासोबत आधार अद्ययावत करणे, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला गॅस योजनेसाठी नोंद आदी विविध कक्ष स्थापित करण्यात येतात. या कक्षाद्वारे नागरिकांना माहिती देण्यासोबत योजनांचा लाभही देण्यात येत आहे.
यात्रेदरम्यान वितरीत करण्यात येणारे योजनांची माहिती देणारे कॅलेंडर आणि पुस्तिकाही नागरिक उत्सुकतेने पाहताना दिसतात. ऑनलाईन प्रश्नमंजुषा आणि प्रोत्साहनपर पुरस्कार हेदेखील नागरिकांसाठी विशेष आकर्षण आहे. शहरातील प्रत्येक भागात या यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने नागरिकांना योजनांचा लाभ घेणे शक्य होत आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी महापालिकेतर्फे आरोग्य आणि इतर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांद्वारे सुनियोजित पद्धतीने यात्रेचे आयोजन करण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांना याचा लाभ होत आहे. राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतर संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजना नागरिकांच्या दारी पोहोचत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पुणे शहरात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंहगड रोड येथील नवश्या मारुती मंदिर आणि दुपारी २ वाजता दांडेकर पूल परिसर, तर २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भारती विद्यापीठाचे मागील प्रवेशद्वार आणि दुपारी २ वाजता गाडीतळ येरवडा येथे यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सद्गुरू उद्यान निगडी येथे, दुपारी २ वाजता ज्येष्ठ नागरिक सभागृह माळी आळी पिंपरी येथे, तर २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शास्त्रीनगर पिंपरी येथे आणि दुपारी २ वाजता बालाजी मंगल कार्यालय रहाटणी येथे यात्रेचे आयोजन होईल.
नागरिकांना यात्रेला भेट द्यावी, असे आवाहन पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी चिंचवड महापालिकाआयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

