काँग्रेस मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची वसईत प्रचारसभा.
मुंबई, दि. १८ नोव्हेंबर २०२४
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. आता विधानसभा निवडणुतही ५० खोकेवाल्या गद्दारांना धडा शिकवून भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ करा आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केले आहे.
काँग्रेस मविआच्या उमेदवारांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची वसई येथे प्रचार सभा झाली. बटेंगें तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं या भाजपाच्या घोषणांचा समाचार घेत खर्गे म्हणाले की महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर सुरु आहे पण काही लोकांना जाती धर्मांमध्ये भांडणे लावायची आहेत. काँग्रेस मविआचा मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचे पालन करून सर्वांना मजबूत करणे हा हेतू आहे. भारतीय जनता पक्ष जाती धर्मात फूट पाडण्याचे काम करत आहे तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी बलिदान दिले आहे हे विसरू नका. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी कन्याकुमारी के काश्मीर पदयात्रा काढली. देशाची लोकशाही व संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही लडाई असून हे काम सर्वांना करायचे आहे.
भाजपा युती सरकारच्या राजवटीत शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचे जगणे कठीण केले आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतमालाला भाव नाही. भाजपा युती सरकारने अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार करून महाराष्ट्राला लुटले आहे. काँग्रेसच्या ५ गॅरंटी व महाराष्ट्रनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी करेल असे सांगून २० तारखेला जनताच भ्रष्टभाजपा युतीला सत्तेतून खाली खेचेल असा विश्वास मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला आहे.