नागपूर-उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या रविंद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत, अशा आशयाचा व्हिडीओ सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उपसभापतींवर आरोप करताना अंधारे यांनी धंगेकर हे या सभागृहाचे सदस्यच नसल्याने त्यांना बोलू न देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून देण्यात आले आहे. त्यामुळे अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. यावर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे अधिवेशन सुरु झाल्यापासूनच रोज सत्ताधारी पक्षावर वारंवार वार करत आहेत. त्यात त्यांनी रविंद्र धंगेकर यांचा मुद्दा उपस्थित करत त्यांना विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या बोलू देत नसल्याचा आरोप केला होता. वास्तविक रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी विधान परिषदेत बोलण्याचा प्रश्नच येत नाही. असा आक्षेप सत्ताधारी पक्षाच्या वतीने घेण्यात आला आहे.
या विषयी बोलताना नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे.