पुणे -तेलंगणाचा काँग्रेस काळातील विकास पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी कोणत्याही संसदेतला मंत्री किंवा सदस्य तेलंगणाला पाठवावा. त्यांच्याकडे येण्यासाठी पैसे नसतील तर मी विमान पाठवतो, दिल्लीत असेल तर दिल्लीत किंवा मुंबईत असेल तर मुंबई मी त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था करतो. तेलंगणात आम्ही सत्तेत आल्यावर 25 दिवसात 18 हजार कोटींची 23 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असल्याचे मत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहंमद, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड उपस्थित होते.
रेड्डी म्हणाले, एक कोटी दहा लाख महिलांना मोफत बस सेवा दिली आहे. त्याकरिता बस प्रशासन यांना 3600 कोटी रुपये दिले गेले. सिलेंडर किंमत 1100 रुपये झाल्याने जनता त्रस्त आहे. सिलेंडरसाठी लोकांना आम्ही 500 रुपयात व्यवस्था केली आहे. जनतेला 200 युनिट वीज मोफत देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एक कोटी 50 लाख धान्य उत्पादन तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांनी घेतले असून त्यांना आम्ही पीक हमी भाव दिला आहे. कॉर्पोरेट रुग्णालय मध्ये लोकांना राजीव गांधी आरोग्य सेवा अंतर्गत सवलत मध्ये आरोग्य सेवा दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे आम्ही पोकळ आश्वासन देत नाही. जे आश्वासने जनतेस दिले आहे त्याची पूर्तता करण्यात येत आहे. मागील 11 महिने आमचे सरकार नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम करत आहे त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यासाठी तयार आहे. महारष्ट्र मध्ये गद्दार अड्डा बनला आहे. मुंबई हे आर्थिक राजधानी पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली त्यांचा मुलगा उध्दव ठाकरे पक्ष चालवत असताना त्यांनी गद्दारी करून सत्ता मिळवली. तसेच अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याशी गद्दारी करून सत्तेत सहभागी झाले.
खासदार अशोक चव्हाण देखील काँग्रेस पक्षा सोबत गद्दारी करून भाजप सोबत गेले. हे सर्वजण गुजरातचे गुलाम झाले असून मुंबई लुटण्याचे काम करत आहे. उद्योगपती गौतम अदानी यांना मुंबईतील भूखंड देण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदी यांची गुजरात किंवा देशात कोणती यशस्वी योजना नसून ते केवळ विरोधी पक्ष यांच्यावर आरोप करत आहे. तसेच धार्मिक आणि जातीय मुद्दे पुढे करत आहे. याबाबत नागरिकात राग असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत आघाडीला साथ दिली आहे. यंदा देखील विधानसभा निवडणुकीत जनता आम्हाला साथ देईल अशी अपेक्षा आहे.