दोनदा १५ हजार कोटीचे बजेट केले पण साधे सीसी टीव्ही कॅमेरे निट बसवले नाही, सिग्नल सिंक्रोनायझिंग करता आले नाही मग १५ हजार कोटीच्या बजेटचे केले काय ? -खासदार अमोल कोल्हे
पुणे : आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणेकरांसाठी, तसेच कसबा मतदारसंघातील नागरिकांसाठी तळमळीने काम केले. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी हा माणूस पोटतिडकीने लढला आणि त्यांच्या या कामाला नाटक असे संबोधून ज्येष्ठ भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची हेटाळणी केली आहे. त्यांची ही हेटाळणी सर्वस्वी गैर आहे आणि ती कसब्यात भाजपला महागात पडेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.पोर्शे कार अपघात, ड्रग्जच्या विळख्यात पुणे, कोयता गँग, खंडणी वसुली , बेरोजगारीने हैराण पुणे अशा प्रकरणात हेमंत रासने झोपलेले का ? असा सवाल हि त्यांनी केला .कसब्यातून दिले गेलेले हेच ते स्वराज्याचे आणि सुराज्याचे स्वप्न होते काय ?
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज कसबा मतदारसंघात धंगेकर यांच्यासाठी पदयात्रा काढली. लाल महालात माँसाहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांनी पदयात्रेला प्रारंभ केला. नंतर त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचेही दर्शन घेतले. अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची आरतीही डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाली. तसेच मंडई परिसरात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून त्यांनी वंदन केले. तसेच मंडईतील व्यापाऱ्यांशीही संवाद साधला.
यानंतर त्यांनी बाबू गेनू चौकात क्रांतिवीर बाबू गेनू यांच्या स्मृतिस्थळा पुष्पहार अर्पण करून वंदन केले. तेथेच सभा घेऊन धंगेकर यांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. कोल्हे म्हणाले की, गेल्या वेळी भाजप नेत्यांनी ‘हू इज धंगेकर?’ असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न भाजपाला महागात पडला. धंगेकर यांनी भरीव कार्यांने आपली येथे ओळख निर्माण केली आहे. शहरातील अवैध पब्ज, मादक द्रव्यांचा पुणे शहराला पडत असलेला विळखा, पोर्शे कार अपघात प्रकरण या महत्त्वाच्या प्रश्नांसह धंगेकर यांनी आमदारकीच्या दीड वर्षाच्या काळात लोकांच्या प्रश्नांवर तळमळीने काम केले आहे. त्यांच्या या कामांची नाटक म्हणून अवहेलना करणे भाजपला महागात पडणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. हेमंत रासने यांनी महापालिकेचे दोनदा १५ हजार कोटीचे बजेट केले पण साधे सीसी टीव्ही कॅमेरे निट बसवले नाही, सिग्नल सिंक्रोनायझिंग करता आले नाही मग १५ हजार कोटीच्या बजेटचे केले काय ? याच काळात तेथील सुरक्षा रक्षकांना देखील कायम सेवेत सामावून घेतले नाही .शीपाई आणि सुरक्षा रक्षक यांची पिळवणूक महापलिकेत करण्यात आली .
आमदार रवींद्र धंगेकर यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी आमदारकीच्या १६ महिन्यांच्या काळात केलेल्या कामाची माहिती देतानाच यापुढील काळात अधिक जोमाने येथील जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मोहन जोशी, अभय छाजेड, अंकुश काकडे, रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात, बाळासाहेब मारणे, संजय मोरे, विशाल धनवडे, गणेश नलावडे, अक्षय माने आदी उपस्थित होते.
यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघात बाइक रॅली काढण्यात आली. त्यात शेकडो तरुण सहभागी झाले. कसबा गणपती येथून रॅलीस सुरुवात झाली. दारूवाला पूल, नाना पेठ, सुभानशा दर्गा, राष्ट्रभूषण चौक, एसपी कॉलेज, राजेंद्रनगर, दत्तवाडी, अलका टॉकीज चौक, शनिवार पेठ, कागदीपुरा व कसबा मेट्रो स्टेशनपाशी रॅली समाप्त झाली.