पुणे, दि. ०६ नोव्हेंबर २०२४: महापारेषणच्या चाकण येथील ४००/२२ केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रात बुधवारी (दि. ६) दुपारी ४.४५ च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकण परिसरातील कुरुळी, नानेकरवाडी, म्हाळुंगे, निघोजे, आळंदी फाटा परिसरातील १८०० उच्च व लघुदाब औद्योगिक ग्राहकांसह सुमारे ११ हजार ८०० घरगुती, व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. ६) पाच तास खंडित झाला होता.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या चाकण येथील ४००/२२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात दुपारी ४.४५ च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. परिणामी ५० एमव्हीए क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे महावितरणच्या २२ केव्हीच्या सहा एक्सप्रेस वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर लगेचच ५ वाजता या सहा एक्सप्रेस वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला. मात्र पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यामुळे ३५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली व भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव नानेकरवाडी, आळंदी फाटा, एमआयडीसी सर्कल व सारा सिटी या चार २२ केव्ही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे आळंदी फाटा, कुरुळी, नानेकरवाडी, निघोजे व म्हाळुंगे परिसरातील ३०० उच्चदाब व १५०० लघुदाब औद्योगिक ग्राहकांचा आणि १० हजार घरगुती व व्यावसायिक अशा सुमारे ११ हजार ८०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. महापारेषणकडून करंट ट्रान्सफॉर्मर बदलल्यानंतर रात्री ९.४५ वाजता या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.