चाकण एमआयडीसीमध्ये महावितरणचे दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित
पुणे, दि. १८ डिसेंबर २०२३: राज्याच्या विकासाला हातभार लावणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी महावितरण कटिबद्ध आहे. या ग्राहकांसाठी पुणे परिमंडल अंतर्गत एमआयडीसी विद्युत सुधारणा योजनेअंतर्गत विविध एमआयडीसीमध्ये ४४ कोटी ७० लाख रुपये खर्चाचे विद्युत विषयक कामे सध्या सुरु आहेत. यातील चाकण एमआयडीसीमधील दोन स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित झाल्यामुळे प्रामुख्याने औद्योगिकसह घरगुती व वाणिज्यिक ३ हजार ८५० ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे अशी माहिती पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.
विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या मंजूर आराखड्यातील किंग्फा २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन व ह्युंदाई २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन सोमवारी (दि. १८) कार्यान्वित करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. अधीक्षक अभियंता श्री. युवराज जरग, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. दिलीप बटवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले की, कार्यान्वित झालेल्या दोन स्विचिंग स्टेशनमुळे अतिभारित होत असलेल्या २२ केव्ही क्षमतेच्या नऊ वीजवाहिन्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामुख्याने उच्च व लघुदाबाच्या १३५० औद्योगिक ग्राहकांसह परिसरातील सुमारे २ हजार ५०० घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. औद्योगिक ग्राहकांसाठी दर्जेदार सेवा देण्यासाठी विद्युत यंत्रणा सुधारणा योजनेअंतर्गत चाकण एमआयडीसीमध्ये १५ कोटी ४९ लाख तर पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रामटेकडी, आकुर्डी, भोसरी, तळवडे व हिंजवडी एमआयडीसीमध्ये एकूण २९ कोटी २१ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यातील विविध कामांना सुरवात करण्यात आली आहे.
यासोबतच चाकण एमआयडीसीमध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून (आरडीएसएस) तीन नवीन उपकेंद्र व २ स्विचिंग स्टेशन्ससह ९४ कोटी ३० लाख रुपये खर्चाचे विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेतून म्हाडा, भांबोली, वाकी येथे ३३/२२ केव्हीचे नवीन उपकेंद्र, कुरूळी व चाकण येथे २२/२२ चे स्विचिंग स्टेशन तसेच ६५ किलोमीटर भूमिगत व उपरी वीजवाहिन्यांचे विभाजन, ४० रिंग मेन युनिट, ८३ नवीन वितरण रोहित्रे, ९० वितरण रोहित्रांची क्षमतावाढ, ८५ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिन्यांचे अपग्रेडेशन आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.
यावेळी कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेंद्र येडके, अमित कुलकर्णी, धनंजय आहेर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. राजेश भगत, उपकार्यकारी अभियंता श्री. विजय गारगोटे, सहायक अभियंता श्री. विक्रांत वरूडे व श्री. संजय बेडदुर्गे आदींची उपस्थिती होती.

