पुणे, दि. १५: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून त्या दिवसापासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्याचा अखेरचा दिवस २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबर रोजी छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक असून त्या दिवशी निवडणूक लढविणारे उमेदवार निश्चित होतील. मतदान २० नोव्हेंबर तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
ते पुढे म्हणाले, मतदारांना मतदान करण्याचा अनुभव आनंददायी सुखदायी सुलभ व्हावा यावर भारत निवडणूक आयोगाने भर दिलेला असून त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन काटेकोर काम करेल. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, ज्येष्ठ मतदार, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आदी किमान सुविधा करण्यात येणार असून ५ किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी रांगांचे व्यवस्थापन, सावलीसाठी मंडप, महिला मतदार, अंध आणि ज्येष्ठ मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, बालकांसाठी पाळणाघर, वैद्यकीय सुविधा आदी अधिकच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी
जिल्ह्यात २१ मतदार संघात एकूण ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार असून अजूनही नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी १० दिवसांपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणीची संधी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी राजकीय पक्षांनीही आवाहन करावे. जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदार केंद्रे असून त्यात ५० ते ६० सहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ होऊ शकते, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी आदर्श आचारसंहिता, फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजिल, केवायसी, सुविधा पोर्टल आदी संगणकीय व्यवस्था, उपयोजके (एप्लिकेशन्स), महिला, दिव्यांग, युवा संचलित, संकल्पना आधारित विशेष मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे आदीबाबत माहिती दिली.