इंदापूर-भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या रुपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक मोहरा विरोधकांच्या हाती लागला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज त्यांनी इंदापूर येथे आयोजित एका दिमाखदार कार्यक्रमात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे पवारांच्या पक्षाची ताकद कैकपटीने वाढली असून, भाजपला मोठे भगदाड पडले आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात ‘परिवर्तन’ होण्याचा विश्वास व्यक्त करत शरद पवार हेच ‘बिग बॉस’ असल्याचे स्पष्ट केले. हर्षवर्धन पाटील म्हणाले, जयंत पाटील जेव्हा, जेव्हा भेटायचे तेव्हा म्हणायचे, का थांबलाय तिथे ( भाजपत ) या इकडे. शेवटी कोणत्याही गोष्टीसाठी योग लागतो. पण मी वैयक्तिक राजकारणासाठी निर्णय घेत नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ‘तुतारी’ हातात धरण्याचा निर्णय घेतला.
हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयात आपलाही अदृश्य हात असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. सुप्रिया सुळे चारवेळा खासदार झाल्या. याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना तीनवेळा खासदार करण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमचा सहभाग हा अदृष्य स्वरुपाचा होता, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
इंदापूरच्या जनतेची मी शरद पवार गटात जावे अशी इच्छा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांचा उठाव आहे. त्यानुसार मी आज शरद पवार गटात प्रवेश केला. एकतर जनतेचा आग्रह होता की मी येथून निवडणूक लढवली पाहिजे. दुसरे म्हणजे बऱ्याच निवडणुकांपासून आमच्या विचारांचे कार्यकर्ते या मतदारसंघात लोकप्रतिनिधी झाले आहेत. मागच्या निवडणुकीत आमचा अवघ्या 1500 मतांनी पराभव झाला. शेवटी जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे जनतेच्या आग्रहासाठी आम्ही शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही
हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवायची आहे. यासाठी त्यांनी महायुतीकडे तिकीट मागितले होते. पण महायुतीतील घटकपक्षांनी विद्यमान जागा आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा पत्ता कट झाला होता. त्यामुळे त्यांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. आता त्याने तिथे विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.