पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले होते. गांधी भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते. स्नेहा कारंजकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. भरतनाट्यम् कलाकार श्रीमती एलोरा बोरा,मायुखी बेजबरूआ यांचा शालिनी टेकाळे यांनी सत्कार केला. तेजस भालेराव यांनी कलाकारांचा परिचय करून दिला.अन्वर राजन यांनी आभार मानले. एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले.डॉॅ.उर्मिला सप्तर्षी,डॉॅ.प्रवीण सप्तर्षी, जांबुवंत मनोहर,श्रीराम टेकाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्रीमती एलोरा बोरा,मायुखी बेजबरू गुवाहटी (आसाम ) मधील प्रसिद्ध भरत नाटयम् कलाकार आहेत.गणेश वंदनेने त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.यानंतर राग मालिका ,ज्योतीस्वरम ,शब्दम, श्रीमन् नारायणा ,अष्टपदी, वैष्णव जन तो, या नृत्य रचना सादर केल्या.मंगलम या नृत्य रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
सप्ताहातील आगामी कार्यक्रम
दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर, प्रा. सुरेंद्र जोंधळे सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.
खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्ये विविध चित्रपट दाखविले जात आहेत.दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’ चित्रपट दाखवला गेला,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.