मुंबई- गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला? ‘बदलापूर’मधील सूत्रधार कधीही समोर येणार नाहीत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खाजगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे , आता काहीही कथा रचली तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही .हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच राज्याचे गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी पोलिसांना हे आदेश दिले असा सवालही त्यांनी विचारला.
अक्षय शिंदे याला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली. अक्षय शिंदेंने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटापटीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. गृहमंत्र्यांनी कोणत्या संस्थाचालकाला वाचवण्यासाठी, इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला असा सवाल त्यांनी विचारला.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज जी गोष्ट झाली त्यावरून राज्यातमध्ये काही कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतोय. अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही.
बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते. कायद्याचा काही वचक आहे की नाही? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला गृहमंत्र्यांना ताबडतोब काढून टाकलं पाहिजे, कधी नव्हे ती महाराष्ट्राची बदनामी होत आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ते म्हणाले की, या एन्काऊंटरमुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. राज्यातली पोलिस यंत्रणा इतकी कूचकामी झाली आहे का? काय चाललंय का महाराष्ट्रात?पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेसोबत अजून कोण आरोपी होतं, या गोष्टीच्या तळापर्यंत जाणं गरजेचं होतं. सत्य बाहेर येऊन खऱ्या दोषीला शिक्षा व्हायला हवी होती. आता त्याचा एन्काऊंटर झाल्यामुळे हे कधीही समोर येणार नाही. आरोपीला मारण्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे हे तपासलं पाहिजे.