पुणे, दि. २३: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणेच्या अधिकार क्षेत्रातील हद्दीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्र. ९६५ अंतर्गत दिवेघाट ते हडपसर ६ चे पूर्व बांधकाम कामाअंतर्गत रस्ते मोकळे करणे (क्लीनिंग), सेवा सुविधांचे (युटीलिटी) स्थलांतरण कामास सुरूवात करण्यात येणार असून महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे काढून घ्यावीत, असे आवाहन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे.
दिवेघाट ते हडपसर या भागात महामार्गालगत व महामार्गाच्या हद्दीमध्ये काही मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही अद्यापही काही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण काढलेले नाहीत.
सदरची अतिक्रमण ७ दिवसात न काढल्यास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासित करण्यात येणार आहे. याकरीता येणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकाकडून वसूल करण्यात येईल. विहित मुदतीनंतर अतिक्रमणे काढताना नुकसान किंवा असुविधा झाल्यास प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे
0000