- 4 हजार महिलांच्या उपस्थितीत पार पडला मेळावा
पुणे – भारताने 2047 पर्यंत ‘विकसित’ राष्ट्र बनण्याचे आपले स्वप्न निश्चित केलेले असताना, या आव्हानाच्या केंद्रस्थानी महिलांचे सक्षमीकरण आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक-आर्थिक विकास हातात हात घालून चालतात.
महिलांना आर्थिक बळकटी दिली तरच समाजाची प्रगती होत असते असे अमोल बालवडकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल बालवडकर म्हणाले.
कोथरुड विधानसभा मतदारसंघात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या अनुषंगाने अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 22) रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानांतर्गत ज्या महिला भगिनींनी नावनोंदणी केली अशा असंख्य भगिनींचा कोथरुड मधील परमहंस नगर, जीत मैदान येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अमोल बालवडकर म्हणाले भारत पायाभूत सुविधांनी बळकट होत असताना महिलांचे सक्षमीकरण तितक्याच ताकदीने केले जात आहे. यासाठी महिलांना आर्थिक पाठबळ दिले जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचाच एक भाग आहे. कोथरुड मतदारसंघातील सुमारे 10 हजार महिलांची लाडकी बहिण योजनेसाठी नोंदणी करून घेतली होती. यापैकी रविवारी 4 हजार महिलांचा काल मेळावा घेण्यात आला. यावेळी अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक साडी देखील भेट म्हणून देण्यात आली. तसेच महिलांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान परिसरातील समस्त महिला भगिनींनी या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी फाउंडेशनच्या वतीने महिलांशी संवाद साधण्यात आला. यातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या अनेक गोष्टींचा उलगडा देखील झाला.