पुणे : जमात-ए-इस्लामी हिंद (JIH) महिला विभाग, पुणेतर्फे ‘नैतिकता म्हणजे स्वातंत्र्यता’ ही एक महिन्याची राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे. पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जमात-ए-इस्लामी हिंद पुणे महिला विभागाच्या शहरप्रमुख असिया शेख म्हणाल्या, “या मोहिमेचे उद्दिष्ट लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना खऱ्या स्वातंत्र्याबद्दल माहिती देणे, तसेच ते नैतिकतेशी कसे जोडलेले आहे हे समजावून सांगणे, हे आहे.”
देशातील महिलांवरील वाढत्या लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या घटनांबद्दल खेद व्यक्त करताना शेख म्हणाल्या, “समाजात हा गैरसमज आहे की नैतिकतेमुळे स्वातंत्र्यावर गदा येते. प्रत्यक्षात, याचे उलट आहे. जेव्हा आपण काही नैतिक नियमांचे पालन करु, आपले नैतिक चारित्र्य विकसित करु, तेव्हा आपल्या महिला सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता व आत्मविश्वास अनुभवतील. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचे मुख्य कारण म्हणजे नैतिक मुल्यांची घट. कोलकात्यातील आर.जी. कार रुग्णालयात एका महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि खून, बिहारच्या गोपालपुर येथील १४ वर्षीय दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार आणि खून, उत्तराखंडच्या उधमसिंह नगर येथे एका मुस्लिम नर्सवर बलात्कार आणि हत्या, आणि महाराष्ट्रातील बदलापूर शाळेतील दोन किंडरगार्डन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी हे सिद्ध केले आहे की देशात महिलांप्रती असलेल्या मानसिकतेवर आणि वर्तनावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.”
JIH पुणे महिला विभागाच्या PR सचिव आयेशा वसीम म्हणाल्या, “महिलांवरील हिंसाचाराची मानसिकता साथीच्या रोगासारखी पसरली आहे, ज्यामुळे आपल्या देशाचा नैतिक पायाच उद्ध्वस्त होत आहे. या समस्येचे मुळ कारण म्हणजे अमर्यादित स्वातंत्र्याच्या नावाखाली नैतिक मुल्यांचे पतन होय. समाजातील नैतिक मुल्यांचा अभाव, महिलांकडे भोगवस्तू म्हणून पाहणे, लैंगिक शोषण, अश्लीलता, विवाहबाह्य संबंध, मद्यपान व अमली पदार्थांचा वाढता वापर, यामुळे महिलांचा छळ आणि शोषण होते. तसेच, लैंगिक रोगांचा प्रसार, गर्भपात, लैंगिक हिंसा आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांसह, कमकुवत कौटुंबिक व्यवस्था, वाढती अश्लीलता आणि माणसाचे नैतिक अधःपतन, हे सर्व समाजाचा मुलभूत पायाच उद्ध्वस्त करत आहेत.”
JIH पुणे महिला विभागाच्या मिडिया सचिव मिनाज शेख यांनी सांगितले की, “राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) आणि राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या आकडेवारीनुसार महिलांवरील गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. या अहवालांमध्ये केवळ नोंदवलेल्या घटनांचा समावेश आहे; बिना नोंद घटना किती हे कोणालाच माहित नाही. महिलांना न्याय मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो? या मोहिमेचा उद्देश, लोकांना हा संदेश देणे आहे की महिलांना सर्व प्रकारच्या शोषण व गुन्ह्यांपासून सुरक्षा मिळवून देणे, म्हणजेच खरे स्वातंत्र्य हे केवळ नैतिक आणि न्यायपूर्ण समाज निर्माण केल्यानेच मिळू शकते, जिथे जात, पंथ, रंग, लिंग, धर्म किंवा प्रदेशाच्या आधारावर कोणताही भेदभाव होत नाही.”
‘नैतिकता हेच स्वातंत्र्य’ या मोहिमेबद्दल माहिती देताना, नाजिमा शेख म्हणाल्या, “या मोहिमेदरम्यान, शिक्षक, समुपदेशक, वकील, धार्मिक विद्वान, नेते आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्याने राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि स्थानिक स्तरांवर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. खरे स्वातंत्र्य आणि नैतिक मूल्यांची ओळख विद्यार्थ्यांना आणि तरुणांना करून देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील. नैतिक मूल्ये सार्वजनिक चर्चेत आणण्यासाठी विविध धर्मांच्या विद्वानांना सामील करून विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.” पत्रकार परिषदेला कोंढवा युनिट प्रमुख स्वालेहा शेरकर उपस्थित होत्या.