नागपूर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या आलिशान भरधाव कारने 5 वाहनांना धडक दिल्याची घटना ऑरेंज सिटी नागपुरात घडली आहे. ज्या कारने हा अपघात झाला ती कार आपला मुलगा संकेत याच्या नावाने असल्याची कबुली बावनकुळे यांनी दिली. पण सोबतच संकेत हाच कार चालवत होता हे वृत्त त्यांनी फेटाळले. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अपघातावेळी संकेत बावनकुळे गाडीतच होते असा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. यामुळे या घटनेचे गांभिर्य वाढले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सोमवारी सांगितले की, अपघातग्रस्त कारमध्ये अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे व रोनित चिंतमवार हे 3 जण होते. या तिघांनाही सोमवारी रात्री उशिरा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांची चौकशी जाली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालक अर्जुन हावरेला अटक केली होती. पण गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे रात्रीच त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
पत्रकारांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्याला संकेत बावनकुळे कुठे बसला होता? असा थेट प्रश्न केला असता त्यांनी ते चालकाच्या बाजूला बसल्याचे सांगितले. संकेत बावनकुळे चालकाच्या शेजारच्या समोरील सीटवर बसला होता. तर रोनित चिंतमवार मागच्या सीटवर बसला होता. या तिघांनी हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर तेथून घरी परत जाताना हा अपघात झाला. डॉक्टरांनी 2 जणांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, त्यांच्या रक्ताचे नमुणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत.
या प्रकरणी केवळ ड्रायव्हरवर गुन्हा दाखल आहे. संकेत किंवा रोनितवर गुन्हा दाखल नाही. या प्रकरणी तपास सुरू आहे.
नागपूरच्या रामदासपेठमध्ये घडलेल्या ऑडी कारच्या अपघाताप्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा संकेत बावनकुळे यांना बोलावून चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. रामदासपेठेते रविवारी मध्यरात्री संकेत बावनकुळे यांच्या मालकीच्या ऑडी कारने काही वाहनांना धडक दिली होती. त्यानंतर ऑडी कार चालकाने तेथून पोबारा केला होता. पोलिसांच्या पुढील तपासानुसार संकेत बावनकुळे त्या वेळी कारमध्ये नव्हते. घटनेच्या वेळेला कार अर्जुन हावरे नामक चालक चालवत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र रोनीत चितंमवार हा होता.
चुकीच्या कृत्यावर कारवाई झाली पाहिजे – बावनकुळे
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही वक्तव्य या घटनेवर आले आहे. तो म्हणाला, ‘ती गाडी माझ्या मुलाच्या नावावर आहे. पोलिसांनी अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी. न्याय हा कोणासाठी वेगळा नाही. दोषींवर कारवाई करावी. कोणाचाही राजकीय संबंध असो, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.