पोलीस दलास मदतीचा क्रिएटिव्ह फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम – पोलीस उपायुक्त संभाजी कदम.
पुणे-सामान्य नागरिक अगदी सहजपणे पोलिसांवर टीका करत असतो. किंबहुना समाजात घडणाऱ्या गैर गोष्टींसाठी पोलिसांना जबाबदार धरत असतो, मात्र पोलीस दल किती विपरीत परिस्थितीत काम करते याची समाजाला जाणीव होणे गरजेचे आहे आणि त्यांच्याशी मैत्री केली, विश्वास टाकला तरच समाजातील गुन्हेगारीवर आळा बसू शकतो असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. गणेशोत्सवात नागरिकांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावण्याचा खर्च टाळून क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कोथरूड पोलीस स्टेशन ला अत्याधुनिक ऑल इन वन झेरॉक्स, प्रिंटर, स्कॅनर भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त संभाजीराव कदम, पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फॉउंडेशन चा हा उपक्रम स्तुत्य असून पोलीस हा जनतेसाठी अविरत सेवेत असतो, सणासूदीच्या काळात किंवा घरगुती आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगात देखील तो बंदोबस्तावर असतो व कायदा व सुव्यवस्था राखतो, त्यामुळे पोलीस आपला मित्र आहे असे समजूनच समाजाने वागावे असे पोलीस उपायुक्त मा. संभाजीराव कदम म्हणाले.
प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलीस आणि पोलीस हा वर्दीतील नागरिक असतो हे आपण ध्यानात घेतले पाहिजे असे ही संदीप खर्डेकर म्हणाले. शासन सर्वच ठिकाणी पुरं पडू शकत नाही त्यामुळे आपल्या भागातील पोलीस स्टेशन ला एखादी लोकोपयोगी वस्तू हवी असेल तर ती देण्यात सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेतला पाहिजे असेही खर्डेकर म्हणाले.
कोथरूड पोलीस स्टेशन ला ह्या यंत्राची आवश्यकता होती, ती दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी आभार व्यक्त केले.
अजूनही काही लागले तर ते आम्ही उपलब्ध करून देऊ असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व विशाल भेलके यांनी जाहीर केले.