पुणे : देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी महाराष्ट्र विधीमंडळात सादर केलेल्या पेन ड्राईव्हवरुन सीबीआयने आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सरकारी वकील प्रविण चव्हाण , पुण्यातील तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, विजय पाटील यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विधीमंडळात केला होता. त्यावेळी त्यांनी पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयातील बसविलेल्या घड्याळात कॅमेर्यातून हे सर्व व्हिडिओ रेकॉडिंग करण्यात आले होते.चाकू लपविणे, छापा कसा टाकायचा, ड्रग व्यवसाय कसा दाखवायचा, केस कशी मोक्कामध्ये बसवायची, हे सांगताना प्रविण चव्हाण दिसून येतात. छापा टाकायला गेलेल्या पथकाचे हॉटेल बुकिंग करणे आणि त्याचे बिले भरली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. याचा तपास शिंदे सरकार सत्तेवर आल्यावर सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
या व्हिडिओ रेकॉर्डिगमध्ये विशेष सरकारी वकील कट रचताना व भाजपच्या विविध वरिष्ठ नेत्यांना गुन्ह्यामध्ये अडविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी बोलताना दिसून येतात. प्रविण चव्हाण हे अर्जदार आणि भाजपच्या इतर नेत्यांवर खोट्या तक्रारी तयार करणे, साक्षीदारांना शिकविणे, रोख रक्कमेची व्यवस्था करणे, तपास अधिकार्यांना सूचना देणे इत्यादी अगदी पहिल्या टप्प्यापासून खोटे गुन्हे दाखल करण्यात गुंतलेले आहेत असे दिसते आहे .
अॅड. प्रविण चव्हाण तसेच तक्रारदार विजय भास्करराव पाटील आणितत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत भाजप नेत्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचला होता. त्यातूनच जळगावमध्ये शुन्य एफआयआर नोंदविला गेला.जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज या संस्थेतील वादाबाबत भाजप नेत्यांना गोवण्यासाठीहा झिरो एफआयआर पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला.गुन्हेगारी कट रचण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी विजय पाटील,तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या सोबत खटल्यात भाजप नेते आणि इतरांना गुंतविण्यासाठी खोटे साक्षीदार व पुरावे बनविले असल्याचे या एफआरआयमध्ये म्हटले आहे.