पुणे :डी एस कुलकर्णी यांच्या कंपन्यात ठेवी बुडलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या चैतन्य सेवाभावी संस्था (असोसिएशन ऑफ डीएसके फ्रॉड व्हिक्टिम्स) ने हिंदू महासंघाच्या सहकार्याने मेळाव्याचे आयोजन केले होते.दि ६ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे हा मेळावा झाला. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार )चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , शिवसेना(उध्दव ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार,एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते अभिजित बोराटे उपस्थित राहिले. त्यातून राजकीय पक्षांचा गुंतवणूकदारांना पाठिंबा मिळाला.पुढील आक्रमक आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात आली .
‘डीएसके प्रकरणात सर्व यंत्रणा कडून सर्वसामान्य व्यक्तींना गृहित धरले जात आहे.आपलेच पैसे मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांना यातायात करावी लागते. राजकीय पक्षांनी गुंतवणूकदारांना न्याय देण्यासाठी हालचाली केल्या नाहीत तर गणेशोत्सवानंतर सर्व राजकिय पक्षांच्या कार्यक्रमांना काळे झेंडे घेऊन उपस्थित राहून गुंतवणूककार हा मुद्दा मांडतील. चर्चा झाल्याशिवाय हे गुंतवणूकदार सभास्थान सोडणार नाहीत.जे पक्ष आज गुंतवणूकदारांच्या व्यथा ऐकायला आले नाहीत, त्यांची यादी लक्षात ठेवली पाहिजे.आम्हाला न्याय मिळाला नाही तर विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून देऊ’ असा इशारा हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिला.
प्रशांत जगताप म्हणाले, ‘ गुंतवणूकदारांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस चा पाठिंबा आहे.आंदोलनात सातत्य असेल तरच यश मिळेल.न्यायप्रविष्ट गोष्ट आहे, म्हणून सत्ताधारी पक्षांनी दुर्लक्ष करू नये.पडद्यामागे काही घडत असेल, तर लक्ष ठेवले पाहिजे.आचारसंहितेपूर्वी गुंतवणूकदारांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे. शिवसेना(उध्दव ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार म्हणाले, ‘ गुंतवणूकदारांच्या लढाईला शिवसेना(उध्दव ठाकरे) पक्षाचा पाठिंबा राहिल. डीएसके यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन,लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता राहिली पाहिजे. तरच गुंतवणूकदारांना न्याय मिळेल.पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पावले उचलली जातील’.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अभिजित बोराटे म्हणाले, ‘गुंतवणूकदारांच्या विषयाला कोणीच हात घालत नाही, ही चिंतेची गोष्ट आहे.आमचे सरकार कोणाचाही रुपया बूडू देणार नाही. डिएसके यांचे व्यवसाय बंद असतील तर ते गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ शकतील असे नाही, मात्र सरकार जबाबदारी झटकणार नाही. येत्या आठवडयात मुख्यमंत्र्यंाची आणि गुंतवणूकदारांची भेट करुन दिली जाईल’.गुंतवणूकदारांचे प्रतिनिधी नितीन आडुळकर म्हणाले, ‘ ज्यांच्याकडे पैसे गुंतवले , ते पैसे द्यायला तयार आहेत. सरकारच्या ताब्यात मालमत्ता आहेत, पण गुंतवणूकदारांना पैसे मिळायला नाहीत, हे दुर्देव आहे.गुंतवणूकदारांना सापत्न भावाची वागणूक देऊ नये. सरकारला स्वतःचे पैसे आम्हाला द्यायचे नाहीत.’चैतन्य सेवाभावी संस्थेचे दीपक फडणीस म्हणाले ‘ गुंतवणूकदारांची एकजूट अभेद्य आहे. अजून राजकीय व्यक्तींनी आम्हाला सहानूभूती दाखवली नाही’.सीए आदिती जोशी यांनी आर्थिक बाबींवर प्रकाश टाकला.
विद्या घटवाई यांनी सूत्रसंचलन केले.स्वागत व प्रास्ताविक यांनी मनोज तारे यांनी केले.आभार नितीन शुक्ल यांनी मानले.हिंदू महासंघ कडून सीए आदिती जोशी,अॅड निता जोशी, अविनाश बोराटे,चैतन्य सेवाभावी संस्थेचे तसेच गुंतवणूकदार मोठया संख्येने उपस्थित होते.