मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे तर भाजपचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे अशीही टीका त्यांनी केली आहे . आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारला तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले, महायुतीकडे चेहरा कोण आहे? ते जिंकणार तर नाहीच. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ते जाणार आहेत का? त्यांचे सरकार आहे, त्यांनी सांगावे. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक त्यांना पालक म्हणून पाहत आहेत. पण महायुतीकडे चेहरा कोण आहे? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, निवडणुकीत विश्वासू चेहरा समोर येतो, जसा आम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघतो. प्रत्येकजण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून पाहतो. त्यांचे काम पाहिले आहे. शेतकरी असेल, महिला असेल, तरुण असेल एक विश्वास आहे. हा माणूस महाराष्ट्रासाठी दिवसरात्र मेहनत करतो, काम करतो आणि महाराष्ट्राच्या हिताचे काम करेल. तसे महायुतीकडे चेहरा कोण आहे? त्यांच्याकडे उत्तरच नाही. ते योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारत आहेत, असा टोला देखील आदित्य ठाकरे यांनी महायुतीला लगावला आहे.आदित्य ठाकरे म्हणाले, माझे आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही, आमचे हिंदुत्व चूल पेटवणारे, भाजपचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसले तर भारत पाकिस्तानवर येतात. सर्वाधिक अतिरेकी हल्ले भाजपच्या सत्तेतच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजप नेते गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला होता, या प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, अटकेची भीती कशासाठी होती. काही चुकीचे केले असेल. एवढे घाबरण्याचे कारण काय होते? आमचे भाजप सारखे तर नव्हते, कोणालाही अटक करा. एकनाथ शिंदेंना अटक करण्याची भाजपची तयारी होती. हे शिंदेंनी आमच्याकडे रडत रडत येऊन सांगितल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.